गोरगरिबांचे होणार जगणं मुश्कील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:28+5:302021-04-08T04:31:28+5:30
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. २३ मार्च रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात ...
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. २३ मार्च रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सर्वच कामाला लागली होती. कोरोनाचा कहर रोखण्यासाठी जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत होती. त्याला रत्नागिरी जिल्हावासीयांनी चांगली साथ दिली होती. एक जरी कोरोनाचा रुग्ण आढळला तरी ती वाडी, गाव सील करण्यात येत होते. आजूबाजूच्या गावे, वाड्यांशी त्यांचा संपर्क येणार नाही, यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध घालण्यात आले होते. संपूर्ण गावच लॉकडाऊन करण्यात येत होते. कोरोनामुळे मोठी दहशत निर्माण झाली होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वच छोटे-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत आले होते. मागील दोन तीन महिन्यांत आर्थिक घडी रुळावर येत असताना अचानक कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाल्याने हातावर पोट असणारे कामगार, रिक्षा-टेम्पो चालक, हातगाडीवाले, छोटे-मोठे व्यापारी आणि इतर व्यवसाय अडचणीत येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटणार असल्याने गोरगरिबांचे एक वेळच्या जेवणाचे वांदे होणार आहेत.
कोरोनाने काही राजकीय मंडळींनी धर्माचा आधार घेऊन मंदिर-मशीद सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. आता कोरोनाचा कहर वाढल्याने त्यांनी या महामारीचीही जबाबदारी घ्यावी, असे अनेकांचे मत आहे. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क लावणे, तसेच गर्दी करू नये, याबाबत वेळोवेळी लोकांना आवाहन केले. तरीही लोक जुमानत नव्हते. कारण आज कमवून उद्या कसे पोट भरेल, अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांना काम मिळेल तरच ते दोन वेळचे जेवणार असल्याने ते तरी काय करणार, असेच म्हणावे लागेल. मध्यंतरी घेण्यात आलेल्या आणि सध्या देशात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये नेतेमंडळी तरी कोरोनाचे नियम, अटी बाजूला ठेवून कार्यरत असल्याचे दिसून येत आहे.
आता पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागल्याने शासनाने कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली असून, घातलेही आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. नाइलाजास्त हे पाऊल शासनाला उचलावे लागले. त्याला आपणच जबाबदार आहोत, असेच म्हणावे लागेल. लोकांनी कोविड नियम, अटींचे पालन केले असते तर ही वेळच आली नसती. त्याला शासन तरी काय करणार.