‘सील’ करण्याचा दळभद्रीपणा योग्यच

By admin | Published: May 20, 2016 10:18 PM2016-05-20T22:18:24+5:302016-05-20T22:50:39+5:30

महेंद्र मयेकर : २६ मे रोजी सावरकर नाट्यगृहात पाणी योजनेचे सादरीकरण

It's a good idea to 'seal' | ‘सील’ करण्याचा दळभद्रीपणा योग्यच

‘सील’ करण्याचा दळभद्रीपणा योग्यच

Next

रत्नागिरी : पालिका सभागृह सील करण्याचा दळभद्रीपणा नगराध्यक्ष म्हणून मला का करावा लागला, याचे उत्तर खासदार विनायक राऊत यांनीच दिले आहे. हा निर्णय घेतला नसता तर त्याचे कायदेशीर परिणाम खासदार राऊत यांच्यासह सर्वांनाच भोगावे लागले असते. त्यामुळे कायद्याच्या कक्षेत जे होते ते आपण केले. हा दळभद्रीपणा असेल तर मला मान्य आहे. आता येत्या २६ मे २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात वाढीव नळपाणी योजनेचे मोठ्या पडद्यावर ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’ केले जाणार असून, लोकप्रतिनिधींसह जनतेसाठीही हे प्रेझेंटेशन खुले राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली.
भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने व मी पुढाकार घेतलेल्या शहराच्या वाढीव नळपाणी योजनेचा गाजावाजा बराच केला गेला. पाणी योजनेसाठी ज्यांचा काडीचाही सहभाग नाही, त्यांनी योजनेच्या प्रेझेंटेशनसाठी सभागृहाची केलेली मागणी नियमानुसार मान्य करता येणारी नव्हती. मात्र, सेनेच्या काही नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे पालिकेत कायदा व सुव्यवस्था स्थिती राखली जावी व खासदार राऊत गोत्यात येऊ नयेत म्हणूनच आपण पंचांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा सभागृह व स्थायी समिती सभागृह सील केले होते. अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर गुन्हा दाखल झाला असता. या योजनेवरून श्रेयवाद लाटण्यासाठीच साऱ्या घडामोडी झाल्या. परंतु आपण हा विषय संपुष्टात आणण्यासाठीच येत्या २६ मे रोजी सावरकर नाट्यगृहात वाढीव नळपाणी योजनेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन ठेवले आहे. हे प्रेझेंटेशन नागरिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे शहरातील १५ ठिकाणी या योजनेचे प्रेझेंटेशन देण्याची आवश्यकता राहणार नाही. खासदार राऊत, आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत या सर्वांना यावेळी आमंत्रित केले जाणार आहे. पालिकेने या योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही एजन्सी नेमली आहे. पालिकेची ही योजना असून, त्यासाठी पालिकेने साडेदहा कोटी रुपये राखून ठेवले आहेत. उर्वरित निधी शासनाकडून मिळणार आहे. साडेदहा कोटींपैकी पाच कोटी रक्कम पालिकेने शासनाकडे जमा केली आहे. रक्कमही लवकरच जमा केली जाणार आहे. एकूण ६८.४० कोटी खर्चाची ही योजना आहे. (प्रतिनिधी)

राऊत यांची सूचना स्वागतार्ह
विनायक राऊत हे आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत. त्यांच्याबाबत मला आदरच आहे. नगरसेवकांनी कशी चुकीची भूमिका घेतली हे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगून आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी अन्य पदाधिकारी व नगरसेवकांसह जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेतली. याला योजनेचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन म्हणता येणार नाही. मात्र, रत्नागिरीत दररोज बाहेरून येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करताना ते प्रमाण २५ हजारऐवजी दुप्पट करण्याची खासदारांची सूचना चांगली असल्याचे मयेकर यांनी आवर्जून सांगितले.


आढावा बैठकच चुकीची...?
शासनाच्या मंत्र्यांना प्रशासकीय कामावर देखभाल करण्याचे व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून वा त्यांना भेटीसाठी बोलावून विचारविनिमय करून सूचनावजा आदेश देण्याचे अधिकार आहेत, असे अधिकार मंत्र्यांचा दर्जा असलेल्या विरोधी पक्षनेते, अशासकीय सदस्यांना नाहीत. संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी आयोजित केलेल्या बैठका किंवा दौरे यांना शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित नाही, असा शासनादेश ११ मार्च २०१६ रोजी शासनाने काढला आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेत गेल्या आठवड्यात आमदारांनी घेतलेली आढावा बैठक चुकीची होती, असे नगराध्यक्ष मयेकर म्हणाले.

Web Title: It's a good idea to 'seal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.