जे. के. फाईल्सच्या कामगारांची दोन दिवसात होणार कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:00+5:302021-04-30T04:40:00+5:30
चिपळूण : तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील जे. के. फाईल्स कंपनीतील कामगारांचे काम बंद असताना, कंपनी व्यवस्थापनाने २९ व ...
चिपळूण : तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील जे. के. फाईल्स कंपनीतील कामगारांचे काम बंद असताना, कंपनी व्यवस्थापनाने २९ व ३० एप्रिल रोजी कंपनीत येऊन कोविड चाचणी करून घेण्याचे आवाहन कामगारांना केले आहे. व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयावर कामगार संघटनेची उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
गाणे खडपोलीमधील जे. के. फाईल्स कंपनीत कामगारांची संख्या सुमारे ७०० आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कामगारांनी ८ दिवस कंपनीचे काम बंद केले आहे. अजूनही २ मेपर्यंत कामावर न जाण्याचा निर्णय कामगार संघटनेने घेतला आहे. अशातच कंपनीतील कामगारांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे. २९ व ३० रोजी कंपनीत कोरोना चाचणी केली जाणार आहे. जे कामगार कोरोना चाचणीत बाधित आढळतील, त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी रुग्णालयेही निश्चित करण्यात आली आहेत. कंपनी सुरू होण्यासाठी व्यवस्थापनाने हालचाली सुरू ठेवल्या आहेत.
...................
तीन कामगारांना निलंबनाची नोटीस
कामगारांना काम बंद ठेवण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी कामगार संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाने निलंबनाची नोटीस बजावली आहे. याविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आणखी एका कामगाराचा मृत्यू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काम बंद ठेवले आहे. अशातच या कंपनीतील एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. हनुमंत शिंदे (मोरवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.