अखेर ४६ वर्षांच्या जे. के. फाईल्स कंपनीला टाळे
By मनोज मुळ्ये | Published: September 9, 2023 01:34 PM2023-09-09T13:34:44+5:302023-09-09T13:34:56+5:30
कायम कामगारांना सात लाखांमध्ये एक ते दोन लाखांची वाढ करून मोबदला देण्यावर तडजाेड
रत्नागिरी : उत्पादनाची मागणी घटल्याने घरघर लागलेल्या रत्नागिरी शहरानजिकच्या जे. के. फाईल्स कंपनीला ४६ वर्षांनी शुक्रवार (८ सप्टेंबर)पासून टाळे ठाेकण्यात आले. यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कामगारांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केला. त्याचा काही अंशीच परिणाम झाला.
जे. के. फाईल्स या कंपनीत फाईल म्हणजे कानस बनवली जाते. धार करण्यासाठी याचा उपयोग होत होता. परंतु आधुनिक कटर आल्यामुळे त्याची मागणी कमी झाली. त्यामुळे जून महिन्यात कंपनी बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. प्रथम कंत्राटी कामगारांना बाजूला करून कायमस्वरूपी कामगारांना ७ लाख रुपयांचा मोबदला देऊन ऐच्छिक निवृत्ती घेण्यासाठी प्रवृत्त केले. कामगारांनी बँकांकडून पाच ते दहा लाखापर्यंतची कर्ज घेतली आहेत. सात लाखामुळे आर्थिक ताळेबंद बसणारा नव्हता. त्यामुळे कायम कामगारांमधील नेत्यांची समिती नेमण्यात आली. या समितीमधील पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या.
त्यानुसार पालकमंत्र्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले हाेते. मात्र, या बैठकीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले नाहीत; परंतु उद्योगमंत्र्यांनी कामगारांना पंधरा ते वीस लाखाचा मोबदला मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. याबाबत त्यांनी बैठक घेण्याचेही जाहीर केले हाेते.
मात्र, ही बैठक होण्यापूर्वीच कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा झाली. या बैठकीनंतर कायम कामगारांना सात लाखांमध्ये एक ते दोन लाखांची वाढ करून मोबदला देण्यावर तडजाेड झाली. त्यानंतर कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला