रत्नागिरीतील जे. के. फाईल्स कंपनीत स्वेच्छा निवृत्तीची नोटीस, कर्मचाऱ्यांना दिली मुदत
By मनोज मुळ्ये | Published: June 20, 2023 07:23 PM2023-06-20T19:23:20+5:302023-06-20T19:25:32+5:30
कंपनीमधील एकूण उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवणे कठीण
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिध्द जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनी बंद हाेण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. कंपनीमधील एकूण उत्पादन खर्च आणि त्याचा ताळमेळ बसवणे कठीण जात असल्याच्या सूचना कंपनीने कामगारांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीची नाेटीस लावण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जे. के. फाईल्स कंपनीच्या इंजिनिअरींग विभागाचे सीएचआरओ एम. व्ही. चंद्रशेखर यांनी १७ जून राेजी कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. त्यात त्यांनी रत्नागिरीमधील प्लांट आणि मशिनरी खूप जुन्या झाल्या असून, अकार्यक्षम बनल्या आहेत. त्यामुळे अधिक चांगले तंत्रज्ञान व मशिनरीची आवश्यकता आहे. परंतु, व्यवस्थापनाला सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे म्हटले आहे.
कायमस्वरुपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ही योजना लागू असली तरी ज्यांचे वय ४० आहे आणि ज्यांना कंपनीत १० वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यांनाच ही योजना लागू होणार आहे. त्यामुळे कंपनीत कायम होऊन चार-पाच वर्ष झालेल्या कामगारांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या युनियनचे पदाधिकारी येऊन कामगारांची भेट घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कंपनीने लागू केलेली स्वेच्छा निवृत्ती योजना न स्वीकारण्याच्या मन:स्थितीमध्ये कर्मचारी आहेत.