जे. के. फाईल कंपनीतील चार कामगार काेराेनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:40+5:302021-04-30T04:40:40+5:30
चिपळूण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गाणे खडपोली येथील जे. के. फाईल कंपनीमधील कामगारांनी आठ दिवस घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. ...
चिपळूण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गाणे खडपोली येथील जे. के. फाईल कंपनीमधील कामगारांनी आठ दिवस घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कामगारांची कोविड चाचणी करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार कंपनी सुरू झाली. कंपनीत पहिल्या पाळीसाठी आलेल्या २०० कामगारांची कोरोना चाचणी केली असता, ४ कामगार बाधित आढळले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत.
तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील जे. के. फाईल कंपनीतील कामगारांनी कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी ८ दिवस घरीच थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या तीन, चार दिवसांपासून कामगार कंपनीत जात नव्हते. कंपनी पुन्हा सुरू होण्यासाठी व्यवस्थापनाकडून आटोकाट प्रयत्न सुरू होता. कामगारांना काम बंद राहण्यासाठी चिथावणी देणाऱ्या तिघा कामगारांना व्यवस्थापनाने निलंबनाची नोटीस दिली होती. दरम्यान, आठवड्यात दोघा कामगारांचा मृत्यू झाल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण होते. कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपनीने कोरोनाची चाचणी करण्याचे ठरवले होते. गुरुवारी आणि शुक्रवारी कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानुसार गुरुवारी कंपनीत पहिल्या पाळीसाठी सुमारे २०० कामगार आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता ४ जण बाधित निघाले आहेत. शुक्रवारीही उर्वरित कामगारांची तपासणी केली जाणार आहे. परिणामी गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली कंपनी पुन्हा सुरू केली आहे.