जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूणमध्ये पाच फिरते दवाखाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:28 AM2021-08-01T04:28:55+5:302021-08-01T04:28:55+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळुणात पाच फिरते दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. संस्थानच्या या ...
रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळुणात पाच फिरते दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. संस्थानच्या या रूग्णवाहिका दवाखान्यात रूपांतरित करण्यात आल्या असून, त्या वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील आजारी व्यक्तींवर उपचार करतील. त्यांचा चिपळूण व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील लोकांना उपयोग होणार आहे.
महापुराच्या तडाख्यानंतर चिपळूणमधील परिस्थिती अद्याप गंभीर आहे. गाळ, साचलेले पाणी, डास आदींमुळे येथे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना सोयीचे व्हावे म्हणून संस्थानने फिरत्या दवाखान्यांची सोय केली आहे. त्यात डॉक्टर, परिचारिका, पुरेसा औषधांचा साठा असणार आहे. चिपळूण व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन या फिरत्या दवाखान्यांमार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत.
यावेळी चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, डॉ. दत्तात्रय कावळे, डॉ. राजेंद्र अहिरे-पाटील, डॉ. आबाजी खैरनार, डॉ. वैशाली ठाकूरदेसाई, डॉ. स्वप्नाली अहिरे, अविनाश जागुष्टे, उपकार्यकारी अधिकारी विवेक कांबळी, राजन बोडेकर, रत्नागिरी जिल्हा सेवाध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, सुनील वीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या फिरत्या दवाखान्यांचे कामकाज डॉ. अरूण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे. यावेळी मुख्याधिकारी विधाते यांनी संस्थानच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, येथे परिस्थिती भयानक असताना गेले आठ दिवस जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे हजारो हात येथील स्थिती पूर्ववत आणण्यासाठी राबत आहेत. त्यांनी रस्ते, गटारे साफ केली, अन्नदान केले. आता या फिरत्या दवाखान्यांमुळे मोफत उपचार केले जाणार आहेत. हे पवित्र काम माणुसकी जपणारे आहे, असे विधाते म्हणाले.
हा कार्यक्रम चिपळूण पालिकेच्या आवारात झाला. ही वैद्यकीय सेवा चिपळूणमधील पूरग्रस्त भागात, वाड्या-वस्त्यांवर पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमाला आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी शुभेच्छा दिल्या. गेले आठ दिवस जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हजारांवर सेवेकरी येथे येऊन घराघरात व रस्तोरस्ती साफसफाई करत आहेत.
-------------------------------------
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूणमध्ये मोफत पाच फिरते दवाखाने सुरू करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, डॉक्टर, नगरपालिका व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.