पावसाची विश्रांती; जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी सोडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:12 PM2022-07-19T17:12:21+5:302022-07-19T17:26:47+5:30
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर
रत्नागिरी : सोमवारपासून पावसाची दिवसभर विश्रांती असून, मध्येच रिपरिप सुरू आहे. जिल्हाभरात ही स्थिती असली तरी खेडमधील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीवर आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १६४ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १८.२२ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत तर तुरळक प्रमाणात सरी पडल्या. हवामान खात्याने जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून, रिपरिप सुरू आहे. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाचे वातावरण भरून राहिले होते.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. या नदीची धोक्याची पातळी ५ मीटरवर आहे. सध्या या रविवारी ६.५ मीटरवर असलेले पात्र सोमवारी ५.३० मीटरपर्यंत आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १५९१५ मिलीमीटर (एकूण सरासरी १७६८.३३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.