जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात जयगड ग्रामस्थांचे १९ला उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:32 AM2021-04-09T04:32:51+5:302021-04-09T04:32:51+5:30
गणपतीपुळे : जयगड येथील जेएसडब्ल्यू फोर्ट व एनर्जी या कंपनी विरोधात जयगड ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ ...
गणपतीपुळे : जयगड येथील जेएसडब्ल्यू फोर्ट व एनर्जी या कंपनी विरोधात जयगड ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचे पत्र कंपनीसह इतर सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे.
सत्यविजय खाडे यांची जागा असणाऱ्या गेटसमोर ग्रामस्थ १९ एप्रिल रोजी उपोषणाला बसणार असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नेहमीच जेएसडब्ल्यू कंपनी स्थानिकांना नोकरीत घेण्यास टाळाटाळ करते. बाहेरगावच्या कामगारांच्या भरतीला प्राधान्य दिले जाते.
याअगोदर येथील स्थानिक मच्छीमारांना धामणखोल बंदरात कायमस्वरूपी मासे मिळून त्यांची उपजीविका चालायची. मात्र, कंपनीमुळे सध्या मासे मिळणे बंद झाले आहेत. धामणखोल बंदरातील चिखल काढून समुद्रामध्ये दहा वाव अंतरामध्ये हा चिखल टाकला जातो. त्यामुळे मच्छीमारांचे फिशिंगचे जाळे या चिखलात रुतून एकावेळेस सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. अशा तक्रारी जयगड ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत.
या मागण्यांसाठी कंपनीच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसल्याचे सांगण्यात आले.
फरजाना डांगे, संतोष हळदणकर, तरबेज सोलकर, सालीम मिरकर, अझिम चिकटे, शैलेश शिरधनकर, सत्यविजय खाडे, भरत भुवड, अनिस आडुस्कर, रिजवान वाडकर उपोषणाला बसणार आहेत. उपोषणाबाबत जेएसडब्ल्यू एनर्जी, फोर्ट कंपनीला पत्र दिले असून हे पत्र रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, सज्जन जिंदाल, पोलीस अधीक्षक, जयगड सागरी पोलीस स्थानक, आरटीओ रत्नागिरी, प्रांताधिकारी रत्नागिरी, जयगड ग्रामपंचायत यांनाही देण्यात आले आहे.