जैतापूर नळपाणी योजनेचे वाजले की...
By admin | Published: December 16, 2014 10:02 PM2014-12-16T22:02:36+5:302014-12-16T23:41:09+5:30
बाजारवाडीचा समावेश कधी : सरपंच म्हणतात फेर टेंडरिंग प्रोसेस होणार
जैतापूर : जैतापूर ग्रामपंचायतीमार्फ त राबवण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेतून पाणी येत नसल्याने ही योजना अपयशी ठरली आहे. जैतापूर गाव खाडीकिनारी असल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासते. ग्रामस्थांना ३०० ते ३५० रुपये दराने कित्येक लीटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. नळपाणी योजनेचा विषय ग्रामसभेत सातत्याने चर्चेला घेतला जातो. मात्र, ग्रामस्थांना थातूरमातूर उत्तरे देण्यात येतात. या नळपाणी योजनेसाठी अनंतवाडी, माजरेकरवाडी या भागाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ई टेंडर नंबर १/१३-१४ ग्रामपंचायत, जैतापूर रक्कम रुपये २७,७४,०८३, दहा महिन्यांची मुदत ठेकेदाराला देण्यात आली होती. ८ आॅगस्ट २०१४ रोजी टेंडर वेबसाईटवर अपलोड करण्यात आले. २५ आॅगस्ट ही अंतिम तारीख ठेवून दुपारी ३ वाजता ते खुले करण्यात येणार होते. सदर टेंडर कोणीही घेतले नाही. अगर आजपर्यंत फेरटेंडर काढण्याची तसदी घेण्यात आली नाही. प्रत्यक्षात दळे ग्रामपंचायत हद्दीतून होळी गावच्या आरोग्य केंद्राच्या जिल्हा परिषद मालकीच्या विहिरीवरुन जैतापूर ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा होणार आहे. ही बाब दळे येथील सरपंचांना कळविल्यानंतर त्यांनी या गोष्टीला विरोध केला आहे.
या नळपाणी योजनेविषयी राजापूरचे उपशाखा अभियंता आर. एल. लटाळ यांना विचारले असता ग्रामपंचायतीने फेरटेंडर काढायला पाहिजे व दळे गावचा विरोध शमला पाहिजे, तरच ही नळ योजना दोन वाडीसाठी कार्यरत करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही या योजनेसंदर्भात पुन्हा टेंडर काढणार असल्याचे या सर्व प्रकाराबाबत सरपंच शैलजा माजरेकर यांनी सांगितल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
बाजारवाडीमध्ये चव्हाटावाडी, मधीलवाडा, मालीम गल्ली, काझी गल्ली, मुखरी गल्ली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. ग्रामपंचायतीने नळपाणी योजनेचा प्रस्ताव पाठवताना बाजारवाडीला वगळून प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी येथील सदस्य मूग गिळून गप्प बसले होते काय? असा सवाल बाजारवाडीतील नळधारकांनी विचारला आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा एक व काँग्रेसचे दोन असे एकूण तीन सदस्य विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत.