जैतापूर प्रकल्पविरोधी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:03 PM2017-08-20T23:03:18+5:302017-08-20T23:03:24+5:30

Jaitapur protests against the Jaitapur protests | जैतापूर प्रकल्पविरोधी जेलभरो आंदोलन

जैतापूर प्रकल्पविरोधी जेलभरो आंदोलन

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : ‘अणुऊर्जा हटाओ.. कोकण बचाओ.. समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, मच्छी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची..’ अशा घोषणा देत मच्छिमार व प्रकल्पविरोधकांनी जेलभरो आंदोलनात स्वत:ला अटक करवून घेतली. यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह सुमारे ७०० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
आंदोलनाची सुरूवात साखरीनाटेतून सकाळी १०.३० च्या सुमारास करण्यात आली. सुरूवातीला आंदोलनात बळी पडलेल्या तबरेज सायेकर या मच्छिमार बांधवाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी गगनभेदी घोषणा देत आंदोलनाला सुरूवात झाली. सुमारे चार ते पाच किलोमीटरचे अंतर कापत आंदोलक प्रकल्पस्थळाच्या दिशेने कुच करीत होते. मात्र, माडबनच्या सड्यावर पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना अडविल्याने तेथेच प्रकल्पग्रस्तांनी ‘कॉर्नर सभा’ घेतली.
या सभेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शासनावर कडाडून टीका केली. येथील जनतेला प्रकल्प नको असतानाही तो लादण्याचे कारस्थान शासन करीत आहे. आंदोलकांना घाबरविण्यासाठी पोलीस बळाचा वापर, आंदोलकांवर खोट्या केसेस टाकणे, असे प्रकार शासन करीत आहे. मात्र येथील मच्छिमार बांधवांनी (पान १ वरून) आपली एकजूट कायम ठेवली आहे. याचे कारण म्हणजे हे आंदोलन पैशासाठी नाही तर अस्तित्वासाठी आहे, याची जाणीव मच्छीमार बांधवांना आहे. महाराष्ट्रात वीजेची कमतरता नाही. शिवाय सौरऊर्जा, समुद्राच्या लाटेवर ऊर्जा निर्मितीचे पर्याय असताना समुद्रामध्ये अणुऊर्जेचे विष टाकून आम्हा सर्वांना नष्ट करण्याचा कुटील डाव आखत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
यावेळी आमदार साळवी यांनीही मनोगत व्यक्त केले. अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात येथील जनतेने सुरूवातीपासून विरोध दर्शविला आहे. वेळोवेळी आंदोलने करून शासनाला ताकद दाखवून दिली आहे. याचाच परिणाम म्हणून आज प्रकल्पाचे काम ठप्प आहे. हा तुम्हा सर्वांचा विजय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मच्छीमार नेते अमजद बोरकर यांनीही प्रकल्पविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिपक नागले, राजापूर सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख प्रकाश गुरव, तात्या सरवणकर, विभागप्रमुख सुनिल राणे, राजा काजवे, नरेश दुधवडकर, जिल्हा परिषद सदस्या भारती सरवणकर, सोनम बावकर, लक्ष्मी शिवलकर, पंचायत समिती उपसभापती अश्विनी शिवणेकर, नगरसेवक सौरभ खडपे, उमेश पराडकर, संतोष हातणकर, पद्मजा मांजरेकर, मन्सूर सोलकर, मंगेश चव्हाण यांच्यासह मच्छिमार बांधव व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान या कॉर्नर सभेनंतर प्रकल्पविरोधक स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. आमदार साळवी यांच्यासह तब्बल ७०० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तब्बल २० एसटी गाड्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना घेऊन साखर विद्यालयात आणण्यात आले. त्यानंतर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून आंदोलकांना सोडून देण्यात आले.

मच्छिमारी बंद...
साखरीनाटेतील मच्छिमार बांधवांनी आपल्या मच्छिमारी बोटी बंद ठेवत आपला उत्स्फुर्त सहभाग दर्शविला होता. तसेच साखरीनाटेतील बाजारपेठेतही शुकशुकाट होता.
आमदार साळवींनाही अटक
यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या सेना पदाधिकाºयांनीही अटक करून घेतली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेºयाचा वापर केला.

Web Title: Jaitapur protests against the Jaitapur protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.