आदित्येश्वर नृत्य कलापथकाचे ‘जाखडी’ नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:33 PM2017-07-24T18:33:51+5:302017-07-24T18:33:51+5:30
सांडेलावगणच्या तरुणांनी तुरा रोविला मुंबईला
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी, दि. २४ : कोकणात गणेशोत्सवात ‘जाखडी’ नृत्य परंपरेला महत्त्व आहे. कोकणात ठिकठिकाणी ही परंपरा जोपासली जाते. रत्नागिरी तालुक्यातील सांडेलावगण येथील आदित्येश्वर नृत्य कलापथकाने तरुणांना जाखडीत सहभागी करून सुमारे ३००च्यावर नृत्याचे कार्यक्रम केले आहेत. गेली सत्तावीस वर्षे ही परंपरा या पथकाने जोपासली आहे.
पारंपरिक कीर्तन, भजनाबरोबरच गणेशोत्सवात नाचाच्या पदन्यासातच गोफ विणणे (चीवली नाच) ही संकल्पना जोपासली जात होती. कालांतराने हा चीवली नाच कमी झाला आणि ‘तुरेवाले-शक्तीवाले’ जाखडी नृत्याने जोर धरला. आज रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवात जाखडीचा सामना पाहायला मिळतो. या पारंपरिक लोककलेचे जतन करण्यासाठी सांडेलावगण गावातील तरुण सरसावले असून, यात त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे.
मुंबई -एलफिस्टन येथील दामोदर हॉलमध्ये त्यांनी आपली कला सादर केली. शीघ्रकवी वासुवाणी यांचे शिष्य तुरेवाले शाहीर अमित पाष्टे, यशवंत बेनेरे, दिनकर पाष्टे यांच्याविरुद्ध शक्तीवाले शाहीर प्रमोद घुमे यांच्यात हा सामना रंगला. या गाण्यांना ढोलकीपटू विशाल बेनेरे, नृत्य कलाकार विकास गुरव, चेतन घाटे, राहुल बेनेरे, दीपेश घाणेकर, दिलीप घाणेकर, राकेश पाष्टे, प्रितेश गुरव, राजेश पाष्टे, रुपेश कुर्ते यांची साथ मिळाली. तर योगेश पाष्टे, संदीप पाष्टे, मनोहर बेनेरे, अजित पाष्टे, अंकुश पाष्टे, नितीन बंडबे, वैभव घाटे, अर्जुन घाटे, रोहित गुरव, प्रथमेश गुरव, सचिन मांजरेकर, सुनील मांजरेकर, प्रवीण पाष्टे यांचे सहकार्य लाभले.