करजुवेत सक्शन पंपांना जलसमाधी : संगमेश्वर तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:23 AM2018-06-09T00:23:58+5:302018-06-09T00:23:58+5:30
संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती.
आरवली : संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाच्यावतीने त्यावर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
करजुवे आणि माखजन खाडीत गेल्या महिनाभरापासून हातपाटीच्या वाळूचा उपसा करण्याची परवानगी घेऊन सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर तहसीलदार संदीप कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागात जाऊन या सक्शन पंपांवर धडक कारवाई करुन सक्शन पंप बोटीसहीत खाडीत बुडवल्याची चर्चा जोरात सुरू होती. त्यामुळे परिसरात होणाºया वाळू उपशाला लगाम बसल्याचे सांगण्यात येत होते.
मात्र, त्यानंतर काही दिवसातच करजुवे, नारडुवेच्या खाडी परिसरात पुन्हा एकदा सक्शन पंपाची धडधड सुरू झाल्याचे समोर आले होते. यावर पुन्हा एकदा ‘लोकमत’मधून आवाज उठवण्यात आला. हा वाळूउपसा सुरु असल्याचे वृत्त सोमवार, ४ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.
या वृत्ताची दखल घेत रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे, संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये बेकायदा वाळूउपसा होत असल्याचे दिसून आले. यासाठी लावलेल्या सक्शन पंपांवर कारवाई करताना पंपासाठी वापरलेल्या बोटींना जलसमाधी देण्यात आल्याचे समजते. यावेळी मंडल अधिकारी मांगले, तलाठी उपस्थित होते. या कारवाईने संबंधित वाळू माफियांना चांगलीच जरब बसली आहे. मात्र, माखजन खाडी परिसरात वाळूउपसा करणारे सक्शन पंप या कारवाईतून सुटले असल्याची चर्चा होत आहे.
हातपाटीच्या सहाय्याने वाळू उपशाची परवानगी देताना, संबंधित व्यावसायिकांनी भरमसाठ रॉयल्टी भरली असून, हातपाटीच्या सहाय्याने ही रक्कम वसूल होणे शक्य नसल्यानेच प्रशासनाच्या मूक संमत्तीने सक्शन पंप लावले जात असल्याची चर्चा होत आहे. या भागात सुरू असणाºया वाळू उपशामुळे खाडीतील पाण्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता अधिक आहे. याठिकाणी राजरोसपणे सुरू असणारा वाळूउपसा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सक्शन पंपाद्वारे होणारा हा वाळूउपसा कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
पंप कसे मिळतात? : कारवाईचे काय?
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे, माखजन खाडीत गेल्या महिनाभरापासून वाळूउपसा.
याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.‘लोकमत’च्या वृत्तानंतर धडक कारवाई करून सक्शन पंप पाण्यात बुडविण्यात आले.बेकायदा होणाºया वाळू उपशाविरोधात कारवाई केल्यानंतर काही महिन्यातच हा व्यवसाय पुन्हा सुरू होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारवाईनंतर पुन्हा हे सक्शन पंप कसे उपलब्ध होतात, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा होत आहे.