ऊर्जामंत्र्यांचा जिल्ह्यात जनता दरबार

By admin | Published: May 20, 2016 10:34 PM2016-05-20T22:34:29+5:302016-05-20T22:47:02+5:30

अधिकाऱ्यांशी साधणार संवाद : शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणीबाबत अधिकारी धारेवर

Janata Darbar in the district of energy minister | ऊर्जामंत्र्यांचा जिल्ह्यात जनता दरबार

ऊर्जामंत्र्यांचा जिल्ह्यात जनता दरबार

Next

रत्नागिरी : वेळेवर काम पूर्ण करण्याकरिता कंत्राटदारांची संख्या वाढवावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेल्या वीजबिलावर तोडगा काढण्याकरिता प्रत्येक फीडरवर ११ शेतकऱ्यांचा एक गट तयार करून शेतकऱ्यांची थकबाकी व अन्य प्रलंबित मुद्द्यांसाठी त्यांना काही अधिकार द्यावेत, या प्रस्तावाबाबत महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयात बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, ऊर्जा मंत्र्यांचे सल्लागार विश्वास पाठक उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज जोडणीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील उदासीनतेबाबत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी चांगलेच खडसावले. प्रत्येक झोनच्या मुख्य अभियंत्यांना लवकरात लवकर वीज जोडणी देण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत ऊर्जामंत्र्यांनी प्रत्येक फिडरवर शेतकऱ्यांचा एक गट तयार करून शेतकऱ्यांना वीज भरण्यास जागरूक करणे तसेच आकडे टाकून वीज चोरी करण्याचे प्रकरण व आकडे टाकताना जीव गमवण्यासारखे प्रकार घडू नयेत, याकरिता शेतकऱ्यांचा गट उपयुक्त ठरेल, अशा सूचना दिल्या.
अमरावती, अकोला, बारामती व औरंगाबाद या झोनमध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बहुतांश ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जातो. तेथील अधिकाऱ्यांना संजीवकुमार यांनी धारेवर धरले. यापुढे कमीत कमी कालावधीत ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना दिल्या. याव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात ट्रान्सफॉर्मर भवन उभारण्याबाबत लवकरात लवकर टेंडर काढून योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ट्रान्सफॉर्मर भवनकरिता बेरोजगार इंजिनियरला प्राधान्य देण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सुचविले. राज्यात इन्फ्रा-१, इन्फ्रा-२, दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, आयपीडीएससारख्या योजनांकरिता कंत्राटदारांची संख्या वाढवणे व त्यांचे थकीत पैसे वेळेवर देण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी प्रत्येक शुक्रवार व शनिवारी विभाग व उपविभाग यांचे दौरे करून तेथील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन तेथील ग्राहकांच्या वीज समस्यांचे निराकरण करावे. ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याकरिता ऊर्जामंत्री प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महावितरणचे सर्कल अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सशी जोडले गेले आहेत. यापुढे ऊर्जामंत्री थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
विजेच्या धक्क्याने दगावण्याच्या घटनांबाबत काळजी घेतली तर ८० टक्के अपघात टाळले जाऊ शकतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागात लाइनमनद्वारे टिल्लू ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता लाइनमनला प्रशिक्षण देणे, त्यांना त्यांची जबाबदारी व केस स्टडीद्वारे त्यांच्यात संवेदनाशिलता निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत संजीवकुमार यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Janata Darbar in the district of energy minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.