‘जाणीव’च्या वेबसाईटचे उद्या लोकार्पण
By admin | Published: December 23, 2014 11:32 PM2014-12-23T23:32:19+5:302014-12-23T23:40:59+5:30
रक्तदान क्षेत्रात समाजासाठी संस्थेचे क्रांतिकारी पाऊल
रत्नागिरी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील रक्तदात्यांची आॅनलाईन माहिती उपलब्ध असणाऱ्या जाणीव फाऊंडेशन या समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या रक्तदान क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल ठरणाऱ्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा गुरूवार, २५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जाणीव फाऊंडेशनने अतिशय कमी वेळेत अत्यावश्यक समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जाणीवने बनविलेली जिल्ह्यातील पहिली ब्लड डोनर डिरेक्टरी अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदान देणारी ठरली आहे. रक्ताची आवश्यकता असणाऱ्या हजारो रुग्णांना जाणीवने रक्त मिळवून देऊन मोलाची कामगिरी बजावली. रक्त विघटन केंद्राची असणारी दुरवस्था, सततचे अपघात आणि डेंग्यूसारख्या रोगांची पसरणारी साथ यामुळे रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.
आता रक्तदान क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल ठरणारी जाणीवची ही वेबसाईट गुरुवार, दिनांक २५ रोजी जनतेला समर्पित केली जाणार आहे. शहरातील शिवाजीनगर येथील सिध्दिविनायक हॉल येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने देश - विदेशात नावलौलिक मिळविलेले टी. व्ही.स्टार जयंत ओक यांचा गाजलेला कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. ही वेबसाईट म्हणजे केवळ संस्थेची माहिती नसून, यामध्ये लवकरच रत्नाागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील प्रत्येकी एक हजार रक्तदात्यांची नावे आणि संपर्क क्रमांक यावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे रत्नागिरीतील कोणत्याही तालुक्यातील अगदी दुर्गम भागातील रक्ताची गरज असणारा रुग्ण आता जवळच्या रक्तदात्याशी अगदी मोबाईल वरूनही संपर्क करु शकणार आहे. तसेच रत्नागिरीतील कोणत्याही तालुक्यातील रक्तदाता आपली नोंदणी आॅनलाईनद्वारे मोफत नोेंदवू शकणार आहे. रत्नागिरीतील तरुणांनी समाजासाठी उचललेले हे क्रांतिकारी पाऊल आहे. अधिक माहितीसाठी अमित सामंत ८०८७३३५९०४, संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. जाणीवच्या या योजनेत सहभाग दर्शवावा, असे आवाहन ‘जाणीव’चे अध्यक्ष महेश गर्दे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)