जनसेवा मंडळातर्फे पावस महावितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:07+5:302021-08-13T04:36:07+5:30
पावस : ज्या पद्धतीने शरिरात रक्त सगळीकडे वाहून नेण्याचे काम रक्तवाहिन्या करतात, त्याच पद्धतीने गावागावातून विद्युत प्रवाह सुरळीत ठेवण्याचे ...
पावस : ज्या पद्धतीने शरिरात रक्त सगळीकडे वाहून नेण्याचे काम रक्तवाहिन्या करतात, त्याच पद्धतीने गावागावातून विद्युत प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम महावितरणचे कर्मचारी जीवाची बाजी लावून करतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन अनुलाेम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळातर्फे पावस येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पावस केंद्रातील २६ लाईनमन आणि इतर कर्मचारी यांचा अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळ, गोळपतर्फे प्रत्येकाला बेलाचे झाड आणि टेस्टर देऊन सन्मान करण्यात आला. पावस महावितरण उपकेंद्र १ आणि २ अंतर्गत भाट्ये ते गावखडी आणि सापुचेतळेपर्यंतचा भाग येतो. यावेळी प्रास्ताविक करताना मंडळाचे प्रमुख आणि गोळप ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे म्हणाले की, समाजामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य महावितरणच्या लाईनमनसह सर्व कर्मचारी करतात. कधी ही सेवा देणारा कर्मचारी लोकांच्या रोषाला बळी पडत असतो. मात्र, तरीही हे सर्व कर्मचारी मनापासून काम करतात. त्यामुळे दुर्लक्षित अशा महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेणे आणि सन्मान करणे हा मंडळाचा उद्देश असल्याचे सांगितले.
अनुलोम भाग जनसेवक रवींद्र भोवड यांनी सांगितले की, कोणत्याही अडचणी न सांगता आपल्या भागातील अंधार दूर कसा होईल, यासाठी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. अशाच त्यांच्या कामातून आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे हा सन्मान करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी जनसेवा मंडळाचे आभार मानतानाच मंडळाने केलेला हा सन्मान आम्हाला काम करण्याची नवी प्रेरणा देईल. अशाप्रकारे पहिल्यांदाच आमची दखल घेतली गेली, असे लाईनमन अजय चव्हाण यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद नावले यांनी केले तर संतोष साळवी यांनी आभार मानले.
यावेळी भाग जनसेवक रवींद्र भोवड, अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाचे प्रमुख आणि गोळप ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे, सचिव समित घुडे, सचिव प्रकाश संते, स्थान मित्र महेश पालकर, अद्वैत काळे, महावितरण कर्मचारी लाईनमन अजय चव्हाण, संतोष साळवी, प्रशांत सावंत, प्रसाद सडकर, साहिल आखाडे यांच्यासह २६ कर्मचारी उपस्थित होते.