खऱ्या अर्थाने ' ती 'दिसू लागली 'स्त्री 'सारखी-रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली जटामुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 08:46 PM2018-12-06T20:46:25+5:302018-12-06T21:43:38+5:30
-शिवाजी गोरे दापोली : एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु असली तरीही समाजात अनेक अनिष्ट रुढी, परंपरा आजही अस्तित्त्वात आहेत. अंधश्रद्धेला ...
-शिवाजी गोरे
दापोली : एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु असली तरीही समाजात अनेक अनिष्ट रुढी, परंपरा आजही अस्तित्त्वात आहेत. अंधश्रद्धेला बळी पडून काही महिला आपल्या डोक्यावर जटा बाळगण्याचे काम करीत आहेत. परंतु अशा महिलांचे प्रबोधन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी हाती घेतले असून, आज खेड तालुक्यातील वेरळ गावातील कमल पवार (६०) यांची जटेतून सुटका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
नंदिनी जाधव या व्यवसायाने ब्युटीशियन होत्या. परंतु समाजाच्या हितासाठी त्यांनी स्वत:च्या मालकीचे ब्युटी पार्लर बंद करुन महिलांच्या जटामुक्तीसाठी पूर्णवेळ काम करीत आहेत. समाजातील काही लोकांची दुकानदारी सुरु राहावी, यासाठी देव-देवीची भीती दाखवून अशिक्षित लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना दु:खाच्या खाईत लोटण्याचे पाप केले जात आहे. समाजात जटाधारी महिलांनासुद्धा इतर महिलांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, तो मिळवून देण्यासाठी जाधव यांचे प्रयत्न सुरु आहेत.
खेड तालुक्यातील वेरळ फुसी नगरमध्ये राहणाऱ्या कमल बामू पवार या रेणुका मातेच्या दासी आहेत. १५ वर्षांपूर्वी अचानक त्यांच्या डोक्यात जटा वाढायला लागल्या. या जटा रेणुका देवीमुळेच वाढत असल्याचे पुणे येथील त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितले. परंतु देवीचा आणि डोक्यातील जटांचा काहीही संबंध नाही. जटांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडते. लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यामुळे जटा काढून शरीराचे अंतरंग व बाह्यरंग सुंदर करण्याचा सल्ला देण्यात आला.
कमल पवार यांच्या डोक्यातील केसात १५ वर्षांपूर्वीपासून जटा होत्या. जटाधारी म्हणून त्यांना लोक आम्मा म्हणत होते. १५ वर्षे त्या रेल्वेमध्ये गोळ्या - बिस्कीट, चॉकलेट विक्रीचे काम करीत आहेत. त्यांच्या डोक्यावरील जटांमुळे रेल्वेत त्यांना कोणीही अडवत नाही. लोक त्यांना दक्षिणासुद्धा देतात. परंतु अशा जगण्याचा त्यांना कंटाळा आला होता.
अंधश्रद्धा निर्मुलन समिती, खेडच्या माध्यमातून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. परंतु अम्मा यांनी गुरुच्या आज्ञेशिवाय जटा कापण्याला विरोध दर्शवला. अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी वेरळ गावात येऊन कमल पवार यांची भेट घेतली. त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धेतील फरक समजावून सांगितला.
समाजात कमल पवारसारख्या हजारो महिला अजूनही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. त्यांची यातून सुटका करण्यासाठी आपला प्रयत्न असून, महिलांना केवळ देवी-देवांची भीती दाखवून त्यांना जटा वाढवायला भाग पाडले जाते. अशा विचारांना मूठमाती दिली जाईल.
- नंदिनी जाधव,
सामाजिक कार्यकर्त्या
जटामुक्तीसाठी पुढाकार घेणार
१५ वर्षांपेक्षा अधिक काळ रेणुका मातेच्या नावाने वाढविलेली जटा कापल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेतली असता आपल्याला खूप चांगले वाटत असून, आता आपली जटामुक्तीतून सुटका झाली. यापुढे इतर महिलांची जटामुक्ती करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही कमल पवार यांनी दिली.
गुरुचीही आज्ञा मिळाली
रेणुका मातेची भक्त असणाऱ्या कमल पवार यांचे गुरु दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे येऊन गेले. त्यांनीसुद्धा जट कापण्याची परवानगी दिली. या परिवर्तनवादी विचाराने कमल पवार यांची जटेतून सुटका झाली.