रूही शिंगाडेचा खेळाडू ते तालुका क्रीडाधिकारी असा थक्क करणारा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:25 PM2019-03-25T12:25:51+5:302019-03-25T12:36:06+5:30
ड्रॉफीजममुळे इतरांप्रमाणे उंची नाही. परंतु, याची कधीच खंत न बाळगता खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आई-वडिलांचे संस्कार व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. महाराष्ट्र शासनानेदेखील याची दखल घेत मानाचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरविले.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : ड्रॉफीजममुळे इतरांप्रमाणे उंची नाही. परंतु, याची कधीच खंत न बाळगता खेळाकडे लक्ष केंद्रित केले. आई-वडिलांचे संस्कार व शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. महाराष्ट्र शासनानेदेखील याची दखल घेत मानाचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरविले. शिवाय थेट नियुक्तीमध्ये खेड तालुका क्रीडाधिकारीपदी रूही शिंगाडे यांची नियुक्ती झाली. इतरांपेक्षा देवाने रूहीला अधिक गुणवत्ता दिल्यामुळे शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात तिने स्वत:चे नैपुण्य सिध्द केले आहे.
सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा रूहीची उंची कमी आहे. परंतु, रूहीचे कुठेही अडले नाही. दहावीनंतर अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी नागपुरात गेलेल्या रूहीला खेळण्याचा सल्ला मिळाला. लागलीच तिने विजय मुनिश्वर यांच्याकडे पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण सुरू केले. राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथमच सहभागी होत तिने कनिष्ठ गटात सुवर्ण तर वरिष्ठ गटात कांस्यपदक पटकावले. येथून रूहीच्या खेळाची प्रगती सुरू झाली.
रूहीला बॅडमिंटनची प्रचंड आवड. शाळेत आल्यावर सोसायटीच्या आवारात मैत्रिणींबरोबर ती खेळत असे. मात्र, २०१३ साली बंगळुरु येथे झालेल्या वर्ल्ड ड्रॉपह्ण गेम्स या आॅलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होत एकेरी, दुहेरी, मिश्र एकेरी गटात सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
२०१५मध्ये लंडन येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरी गटात कांस्यपदक मिळवले. २०१७ साली कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड ड्रॉप आॅलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक तर साऊथ कोरिया येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात कांस्य पदक मिळवले. २०१७ चा महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कार तिने मिळवला.
नुकत्याच झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी गटात तिने सुवर्णपदक मिळवले. तिन्ही गटात सुवर्णपदक प्राप्त करणारी राज्यातील ती पहिली खेळाडू ठरली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा दर दोन वर्षानी होते. यावर्षी आॅगस्टमध्ये स्वित्झर्लंड येथे ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे रूहीने आतापासूनच सराव सुरू केला आहे. शासनाने दिलेल्या थेट नियुक्तीतून रूहीची निवड खेड क्रीडाधिकारीपदी झाली असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिने पदभार स्वीकारला आहे.
आई-वडिलांचा पाठिंबा
जन्मत: ड्रॉफीजम या प्रकारचे अपंगत्व असले तरी मला आई-वडिलांनी दिलेल्या सबळ प्रोत्साहनामुळेच मी यश संपादन करू शकले आहे. माझी क्रीडा क्षेत्रातील घोडदौड पाहून माझे धाकटे जुळे भाऊ कराटेपटू बनले आहेत. शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांचाही मला भक्कम पाठिंबा लाभला.