आंबेरीत कनिष्ठ अभियंता जाळ्यात‘
By Admin | Published: February 3, 2017 11:59 PM2017-02-03T23:59:43+5:302017-02-03T23:59:43+5:30
लाचलुचपत’ची कारवाई; दोघांना अटक
देवगड : देवगड तालुक्यामधील तिर्लोट आंबेरी येथील पतन विभागामार्फत बांधकाम करण्यात आलेल्या निवारा शेड कामाच्या मंजूर रकमेचे बिल काढून देण्याकरिता देवगड पतन उपविभागाचे सहायक अभियंता सुहास भास्कर जाधव (वय ५५) यांनी अडीच लाख रुपयांची मागणी एका ठेकेदाराकडे केली होती. त्यापैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता स्वप्निल पांडुरंग वाघमोडे (२४) यांना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
सुहास जाधव व स्वप्निल वाघमोडे यांच्या विरोधात देवगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून स्वप्निल वाघमोडे यांना ताब्यात घेतले आहे, तर सुहास जाधव यांना मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास देवगड पतन विभाग कार्यालयामध्ये केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तिर्लोट आंबेरी येथे पतन विभागामार्फत खाडी किनारी निवारा शेडचे काम तालुक्यातील वाडा गावातील एका ठेकेदाराने घेतले होते. हे काम ९ लाख ५० हजार रुपयांचे होते. या कामाच्या मंजूर रकमेचे बिल काढून देण्याकरिता देवगड पतन उपविभागाचे सहायक पतन अभियंता सुहास भास्कर जाधव यांनी तीन लाख रुपयांची मागणी ठेकेदाराकडे केली होती. ठेकेदार व जाधव यांच्यात तडजोड होऊन अडीच लाख रुपयांचा तोडगा निघाला. यापैकी ९० हजार रुपये यापूर्वी जाधव यांच्याकडे दिले होते.
यानंतर ठेकेदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाधव यांची तक्रार दिली होती. यानंतर राहिलेल्या १ लाख ६० हजारापैकी ५० हजार रुपयाचा हप्ता जाधव यांच्याकडे देण्यासाठी बुधवारी १ तारखेला तक्रारदार ठेकेदाराने फोन केला. तेव्हा जाधव हे मुंबईला असल्याने त्यांनी ५० हजार रुपये कनिष्ठ अभियंता स्वप्निल वाघमोडे यांच्याकडे देण्यास सांगितले. यावरून तक्रारदाराने ५० हजार रुपये स्वप्निल पांडुरंग वाघमोडे यांच्याकडे देत असताना शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास देवगड पतन विभागाच्या कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात स्वप्निल वाघमोडे यांना पकडले आहे. (प्रतिनिधी)