नोटांअभावी जेमतेम एटीएम सुरू
By admin | Published: November 11, 2016 11:01 PM2016-11-11T23:01:41+5:302016-11-11T23:01:41+5:30
प्रदीप पी. : बँकांच्या विभागीय कार्यालयाकडून रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा सुरू, प्रशासनाकडून सातत्याने आढावा
रत्नागिरी : पाचशे आणि हजार रुपयांच्या सध्याच्या नोटा चलनातून बाद ठरवण्यात आल्यानंतर साहजिकच बँकांमधील ग्राहकांची गर्दी वाढली आहे. बँकांनी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ कामकाज सुरू ठेवून पैसे स्वीकारणे, बदलणे तसेच काढून देणे, या गोष्टी सुरू ठेवाव्यात, अशा सूचना आपण दिल्या आहेत. सद्यस्थितीत १00 रुपयांच्या नोटांची कमतरता असल्यामुळे जिल्ह्यात मोजकीच एटीएम सेंटर सुरू आहेत. नोटांची उपलब्धता झाल्यानंतर उर्वरित एटीएमही सुरू होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी ‘लोकमत’ला दिली.
पाचशे आणि हजार रुपयांच्या सध्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मंगळवारी रात्री जाहीर झाला. तेव्हापासून लोकांमधील चलबिचल वाढली. बुधवारी सकाळच्या सत्रात ग्राहकांशी होणाऱ्या वादामुळे एक पेट्रोल पंप बंद झाला. त्यावेळी लगेचच जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी जिल्ह्यातील सर्व खात्यांचे महत्त्वाचे अधिकारी तसेच पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोणकोणत्या खात्यांनी या नोटा स्वीकारल्या पाहिजेत, हे सांगतानाच लोकांची गैरसोय न करण्याच्या स्पष्ट सूचनाही दिल्या.
बुधवारी बंद असलेल्या बँका गुरूवारी सुरू झाल्या. खातेदारांनी सध्याच्या नोटा बदलण्यासाठी, त्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी रांगाच रांगा लावल्या. लोकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकांचे काऊंटर तीन वाजता बंद न करता उशिरापर्यंत सुरू ठेवावेत, अशा सूचना आपण दिल्या होत्या. त्यानुसार बँका साडेपाच वाजेपर्यंत लोकांकडून पैसे स्वीकारत आहेत आणि बदलूनही देत आहेत. पाचशे तसेच दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध झाल्या आहेत. बँकांमधून पैसे काढणाऱ्यांना त्या दिल्या जात आहेत. मात्र, त्याचे प्रमाण मर्यादीत असल्याने १00च्या नोटाही दिल्या जात आहेत. रत्नागिरीमध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्र या तीन बँकांकडे करन्सीचेस्ट (रिझर्व्ह बँकेच्यावतीने नोटा साठवून ठेवण्यासाठी मिळालेली प्राधिकृतता) आहेत. त्यांनी जिल्ह्यातील आपल्या शाखांसाठी गरजेची रक्कम रिझर्व्ह बँकेकडे मागितली आहे. जसजशी या रकमेची उपलब्धता होत जाईल, तसतसा या रकमेच्या वितरणाचा वेग वाढेल आणि ही समस्या संपेल, असा विश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)
एटीएमला मिळणार १00 रूपयांच्याच नोटा
पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नवीन नोटा उपलब्ध होत असल्या तरी एटीएम सेंटरमध्ये सध्या १00 रूपयांच्याच नोटा उपलब्ध होणार आहेत. नव्या नोटांचा आकार लक्षात घेऊन त्यानुसार एटीएममधील पैसे ठेवण्याच्या ट्रेमध्ये बदल करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत दोन हजार रूपयांच्या नोटा एटीएममध्ये ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. आता त्यासाठी बँकांना आपल्या एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा लागणार आहे. तो बदल होईपर्यंत १00 रूपयांच्या नोटा एटीएममधून मिळतील्