राजापूर तालुक्यातील 'जुवे बेट' पाडणार जगाच्या नकाशावर वेगळी छाप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:58 PM2022-02-05T18:58:02+5:302022-02-05T18:59:49+5:30
दळणवळणाची अन्य कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाची बेट म्हणून स्वतंत्र ओळख स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर आजही कायम
विनोद पवार
राजापूर : तालुक्यात चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले गाव म्हणजे जुवे. पारंपरिक छबिना म्हणजे होडी वगळता दळणवळणाची अन्य कोणतीही साधने नसलेल्या जुवे गावाची बेट म्हणून स्वतंत्र ओळख स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर आजही कायम आहे. मात्र याठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे.
जुवे बेटावरील याच पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न करता रोजगाराला चालना देत वन विभागामार्फत कांदळवन उद्यान निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरीता 10 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील जुवे बेट लवकरच जगाच्या नकाशावर आपली वेगळी छाप पाडणार आहे.
आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री अॅड.अनिल परब यांच्या शिफारशीने चिपळुण वन विभागामार्पत कांदळवन उद्यान निर्मितीचे काम हाती घेण्यात येणार आहे. 10.60 हेक्टर क्षेत्राकरीता सुमारे 10 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.
कांदळवन उद्यानाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार निर्मीती अंतर्गत खेकडा पालन, कोळंबी पालन, विविध रंगीत माशांचे उत्पादन करणे या बाबीकरीता वाव मिळणार आहे. सदर उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र, कांदळवन म्युझियम, तरंगते रस्त, जेटी, निरीक्षण मनोरे इत्यादी इतर कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्यातील हे छोटेसे जुवे बेट लवकरच जगाच्या नकाशावर येणार आहे.
निळ्याशार पाण्याचा वेढा
ब्रिटिशकाळामध्ये राजापूरचे बंदर निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. बंदरामध्ये ज्या खाडीतून जहाजे येत होती, त्या जैतापूरच्या खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसले आहे. एका बाजूला जैतापूर बंदर, दुसऱ्या बाजूला देवाचेगोठणे, धाऊलवल्ली, मारवेली गाव आदी गावांचा सहवास लाभलेल्या जुवे बेटाला समुद्राच्या निळ्याशार पाण्याने वेढा घातलेला आहे.
छोट्या होडीतून सुमारे तीन किलोमीटरची समुद्रसफर करून गावात प्रवेश केल्यानंतर गावपणाची साक्ष मिळते. या अनोख्या गावाचे क्षेत्र अवघे 45 हेक्टर आहे. तर या गावाची लोकसंख्या 78 इतकी असून गावात 35 घरे आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
जुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभली आहे. औरंगजेबाकडून संभाजीराजांना कोकणात संगमेश्वर येथे अटक होण्यापूर्वी राजांनी सोबत असणाऱ्या ताराराणींना कोल्हापूरला सुखरूप पाठविण्यापूर्वी राजापूर किंवा सिंधुदुर्गात काही काळ ठेवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. त्यावेळी ताराराणींना आरमाराने राजापूर खाडीमार्गे सिंधुदुर्गला नेण्यात येणार होते. ही जबाबदारी आरमारी मालोजी खोत शिंदे-कांबळी यांच्यावर होती. राजापूर खाडीच्या मुखावर व अरबी समुद्रालगत असलेल्या यशवंत गडावरील पोर्तुगीजांमुळे ताराराणींना बाहेर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे काही दिवस ताराराणींना जुवे बेटावर ठेवण्यात आले. ही जबाबदारी पार पाडणाऱया मालोजी खोत शिंदे-कांबळींना हे बेट इनाम देण्यात आले.
अन् जुवेवासीयांनी धरली मुंबईची वाट
कुणाचीही वस्ती नसलेल्या जुवे गावचे कांबळी पहिले वंशज मानले जातात. किरकोळ शेती, सागरसंपत्तीवर अवलंबून असलेल्या जुवेवासीयांना काळानुरूप उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावू लागला. त्यातून जुवेवासीयांनी मुंबईची वाट धरली. खाडीतील मुळे, खेकडे, कालवे या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नाही. ग्रामपंचायत आणि फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून आंबा आणि काजूची अडीच हजारांहून अधिक झाडांची लागवड झाली. गावात 1984 मध्ये वीज आली. होडी हेच संपर्काचे एकमेव साधन. गावामध्ये एकही दवाखाना वा वैद्यकीय सुविधा नाही वा दुकान नाही.
जुवे गावात पारंपरिक पद्धतीची उताराची कौलारू घरे अधिक आहेत. अलीकडे चिरेबंदी आणि स्लॅबच्या घरांची उभारणी झाली आहे. आंबा, फणस, नारळ, काजू यांबरोबरच वड, काजरा, धामन, किंजळ, पिंपळ आदी झाडांमुळे आल्हाददायक वातावरण आहे. गावामध्ये श्री रवळनाथाच्या दोन प्रमुख मंदिरांबरोबरच राईतील श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. समुद्रकिनाऱयामुळे जुवे गावाला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी त्या समुद्रकिनाऱ्यामुळे तसेच निसर्गसौंदर्यामुळे गावाला पर्यटन साज चढला आहे.