Ratnagiri: जुवे-जैतापूर ग्रामपंचायत तब्बल १२ वेळा बिनविरोध, शिवसेना ठाकरे गटाचा ग्रामपंचायतीवर दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:37 PM2023-11-06T13:37:01+5:302023-11-06T13:38:27+5:30
बिनविरोधची परंपरा कायम
राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल बाराव्या वेळीही बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीच्या इतिहासात एकदाही मतदान प्रक्रिया पार पडली नाही. यावेळीही बिनविरोधची परंपरा कायम राखली असली तरी अद्यापही या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे भयान वास्तव आहे.
जुवे जैतापूर गाव हे जैतापूरला जवळ असून चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. यामुळे भौगलिक क्षेत्रही मर्यादीत आहे. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये ८२ मतदारांनी आपली नावे नोंदविली आहेत. रत्नागिरी जिल्हातील सर्वाधिक कमी मतदार असलेली ही ग्रामपंचायत आहे. ७ सदस्य संख्या व लोकनियुक्त सरपंच अशी ८ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यंदाही जुवे जैतापूर ग्रामपंचायतीने आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली असुन आता या ग्रामपंचायतीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने आपला दावा केला आहे.
शिवसेनेचे वर्चस्व
गेली ५४ वर्ष या ग्रामपंचायतीवर कायम शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र अद्यापही या गावाच्या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक समस्येमुळे ही ग्रामपंचायत समस्यांचे आगर बनली आहे.