रत्नागिरी: काजळी नदीला पूर, पुरामुळे ६६ वर्षांत प्रथमच सांब देवाच्या हरिनाम सप्ताहात खंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:13 PM2022-08-10T17:13:36+5:302022-08-10T17:14:03+5:30
श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या साेमवारी सप्ताहाला सुरुवात हाेऊन तिसऱ्या साेमवारी सप्ताहाची सांगता हाेते.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा ताेणदे गावातील स्वयंभू श्रीदेव सांब मंदिराला वेढा पडला आहे. सप्ताहाला सुरुवात हाेण्यापूर्वीच मंदिराभाेवती पुराचे पाणी शिरल्याने तब्बल ६६ वर्षांत प्रथमच श्रावणातील अखंड हरिनाम सप्ताहात खंड पडला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ताेणदे गावातील शंकराचे स्वयंभू श्रीदेव सांब देवस्थान काजळी नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिरात १९५६ सालापासून श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे. श्रावण महिन्यातील दुसऱ्या साेमवारी सप्ताहाला सुरुवात हाेऊन तिसऱ्या साेमवारी सप्ताहाची सांगता हाेते. या सप्ताहात गावातील सहा वाड्यातील ग्रामस्थ सहभागी हाेतात. सप्ताहाच्या कालावधीत तीन तासाचे पहारे लावले जातात; मात्र मंदिराभाेवती पुराचे पाणी साचल्यास त्यावेळी पहारे न करता सर्व ग्रामस्थ एकत्र येतात.
यावर्षी मंदिरात श्रावणातील दुसऱ्या साेमवारी (दि. ८ ऑगस्ट) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात हाेणार हाेती; मात्र मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आला असून, हे पाणी ताेणदे गावातील सांब मंदिराभाेवती साचले आहे. त्यामुळे मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सप्ताहाला सुरुवात हाेण्यापूर्वीच पुराच्या पाण्यात मंदिर असल्याने सप्ताह सुरू न हाेता खंड पडला आहे.
गतवर्षी मंदिरात सप्ताह सुरु झाल्यानंतर पुराच्या पाण्यात मंदिर बुडाले हाेते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीही पुराचे पाणी मंदिराभाेवती राहिल्याने ग्रामस्थांनी छातीभर पाण्यात राहून सप्ताहाची सांगता करण्यात आली. तर ग्रामस्थांनी हाेडीच्या साहाय्याने मंदिराभाेवती प्रदक्षिणा घातली हाेती. पुराच्या पाण्याने मंदिराला वेढल्यास बच्चे कंपनींना मंदिरात आणण्यासाठी मनाई केली जाते. मात्र, यावर्षी सप्ताह सुरु हाेण्यापूर्वीच पुराचे पाणी मंदिरात शिरल्याने सप्ताहाला सुरुवात न हाेता खंड पडला आहे. आजवर प्रथमच असे घडले आहे.
हाेडीतूनही प्रदक्षिणा घालून सांगता
यापूर्वी सप्ताह बसण्यापूर्वी पुराचे पाणी मंदिरात शिरलेले नाही; मात्र सप्ताहाची सांगता हाेताना पुराचे पाणी आल्यास हाेडीतून ढाेल-ताशांच्या गजरात पालखीची मंदिराभाेवती पाच प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर सप्ताहाची सांगता केली जाते.
आता तिसऱ्या साेमवारी बसणार सप्ताह
मंदिरात दुसऱ्या साेमवारी सप्ताह सुरू हाेऊन तिसऱ्या साेमवारी सप्ताहाची सांगता हाेते; मात्र यावर्षी पुराच्या पाण्यामुळे तिसऱ्या साेमवारी (१५ ऑगस्ट) सप्ताहाला सुरुवात हाेणार आहे. त्याची सांगता चाैथ्या साेमवारी (२२ ऑगस्ट) हाेणार आहे.
पुरामुळे देव फळीवर
पुराचे पाणी मंदिरात शिरल्यास मंदिरातील देवतांच्या प्रतिष्ठापनेबाबत अडचण येते. त्यावेळी मंदिरात वरच्या बाजूला असणाऱ्या लाकडी फळीवर देवतांची पूजा केली जाते. तेथेच देवतांची पूजा करुन हरिनाम सप्ताह साजरा केला जाताे.
माझ्या ४५ वर्षांच्या आठवणीत प्रथमच अखंड हरिनाम सप्ताहात खंड पडला आहे. आजवर सप्ताह बसल्यानंतर मंदिराभाेवती पुराचे पाणी साचत हाेते; मात्र यावर्षी सप्ताह बसण्यापूर्वीच पुराच्या पाण्यात मंदिर आहे. त्यामुळे सप्ताहाला सुरुवात झालेली नाही. - संदीप प्रकाश पावसकर, ग्रामस्थ