कलम आणि बाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:50+5:302021-07-05T04:19:50+5:30
कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब ...
कलम बांधायचे म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाची फांदी रायवळ आंब्याच्या रुजलेल्या बाट्याला प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून ठेवायची. सर्वांनाच हे कसब अवगत नसे. आम्ही हायस्कूलला असताना सुरेश तरळ (सुऱ्यादादा) आणि हायस्कूलचा हुशार माजी विद्यार्थी रवी दादा (कै. रवींद्र तरळ गुरुजी) कलमे बांधायला येत. प्रत्येक विद्यार्थ्याने आणलेल्या फांद्या आणि बाटे तपासून घ्यायचे काम ते करत. म्हणतात ना... ‘शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे ते मुलांनी आणलेल्या १५ फांद्या कसोशीने तपासून घेत. मुख्याध्यापक आनंदकुमार जाधव स्वतः लक्ष देऊन हे काम पार पाडत. शिपाई नंदूदादा सोबत असे पण त्याचे काम इमानेइतबारे असल्याने कोणा विद्यार्थ्यांचे काहीच चालेना.
फांद्या कोवळ्या असल्या, बारीक असल्या, त्यांना नीट डोळे नसले तर हमखास बाद होत. साधारण काळपट, टोकाला टपोरा डोळा असलेली, साधारण मध्यम जाड आणि तुकतुकीत फांदी सर्वांच्या पसंतीस उतरत असे. सरावाने हे लक्षात येईस्तोवर घरच्या मोजक्या कलमाच्या कोवळ्या फांद्या मोडून वाट लागे.
आंब्याच्या बाटांची पण तीच गत. कोवळ्या आणि खोड जाडसर, लाल असलेल्या बाटा घेऊन जायला लागत असे. बरे वाडीत अनेकजण शाळेत जाणारे त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला बाटा येणार तरी कोठून. पण सरांच्या भीतीपायी त्या जमवाव्या लागत. त्यासाठी विशेषतः उकरड धुंडाळावे लागत. शेणाच्या गायरी शोधाव्या लागत. महेश तेंडुलकर यांची नर्सरी पाहिल्यावर हे सारे सोपे झाले. शाळेला मदत म्हणून शाळेत बांधलेली कलमे बहुधा तेच विकत घेत. त्यांच्या नर्सरीत बाटा रुजवल्या जात. जमीन खणून त्यात आंब्याच्या कोयी टाकून वर गुत (भाताचे मळलेले गवत) घालून मस्त गालीचा तयार केला जाई. हव्या तितक्या बाटा मिळत.
प्रार्थना झाल्यावर कलमे बांधायचे काम सुरु होई. दोन वर्ष पार केल्याने जबाबदार मुले म्हणून बऱ्याचदा दहावीच्या मुलांना हे काम नंदूदादासोबत करावे लागे. साधारण दीड-दोन हजार कलमे बांधली जात असावीत. त्यांना पाने फुटू लागली की, सर्वांनाच श्रमाचे चीज झाल्यासारखे वाटे. या काळात किती कलमे जगली? याची सर्वांनाच उत्सुकता असे. लहान मुलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करावा लागे. पण ही सारी कामे सरांच्या देखरेखेखाली दरवर्षी नियोजितपणे पार पडत.
शालेय ज्ञान व्यवहाराशी कसे जोडावे, कार्यशिक्षण का महत्त्वाचे आहे? याची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमातून नकळतपणे बरीच मुले कलमे बांधायला शिकली. पावसाळ्यात घराच्या पडवीपडवीत माती, बाटा, कलमाच्या फांद्या दिसू लागल्या. स्वतः कलम टोपून ते रुजले याचा आनंदही मिळत होता. आंब्यांना टोपलेल्या कलमाना जेव्हा आंबे लागतात, तेव्हा टोपणाऱ्याचे नाव निघाल्याशिवाय राहात नाही. बऱ्याच जणांना हे कलमपुराण वाचून ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अण्णा नाईक आठवतीलही. पण त्याच्या कलम लावण्याच्या प्रकारापेक्षा कलम टोपणे हाती घेतल्यास भविष्यात गोड फळे चाखण्याची संधी नक्कीच मिळेल हं !
- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा