रत्नागिरीमध्ये २१पासून कालिदास व्याख्यानमाला
By admin | Published: November 17, 2014 09:59 PM2014-11-17T21:59:32+5:302014-11-17T23:52:04+5:30
पुणे येथील वैदिक संशोधन मंडळाच्या संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. भाग्यलता अशोक पाटसकर या प्रमुख व्याख्यात्या
रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे यावर्षी दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी कालिदास स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेला पुणे येथील वैदिक संशोधन मंडळाच्या संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. भाग्यलता अशोक पाटसकर या प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘यज्ञ म्हणजे काय?’ या विषयावर, तर शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी ‘सोमयाग’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ५ वाजता डॉ. भाग्यलता पाटसकर हे व्याख्यानपुष्प गुंफणार आहेत.
डॉ. भाग्यलता पाटसकर यांनी १९८५ ते २००० या काळात ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, पुणे’ येथे संशोधक म्हणून कार्य केले. २००० पासून ‘वैदीक संशोधन मंडळ, पुणे’ येथे संचालक म्हणून कार्यरत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अध्यापन, पीएचडी मार्गदर्शक आहेत. त्यांनी ३४ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये निबंध वाचनात सहभाग घेतला. त्यांचे गुरुगीता, कठ आरण्यक, पवित्रेष्टी इत्यादी पुस्तकांचे सटीप भाषांतर, १३ ग्रंथांचे संपादन, ६ ग्रंथांकरिता सहसंपादन, ७५ शोधनिबंध व लेख प्रकाशित तसेच शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन धनपाठाच्या ९० डी. व्ही. डी. तयार करण्याचा प्रकल्प पूर्ण. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कवी कुलगुरु कालिदास विश्वविद्यालय, रामटेक येथे (२०१०-१५) या कालावधीत विद्यासमितीवर नेमणूक, सातवळेकर पुरस्कार, कवीकुलगुरु कालिदास विश्वविद्यालय, रामटेक यांचा वेदविभूषण पुरस्कार, पं. लाटकर शास्त्री पुरस्कार, मुंबई यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कालिदास स्मृती व्याख्यानमालेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)