केळशीचा गजानन संघर्ष विजेता
By Admin | Published: December 30, 2014 09:31 PM2014-12-30T21:31:45+5:302014-12-30T23:32:57+5:30
दापोली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा; लाडघरला दुसऱ्या क्रमांकावर समाधान
आंजर्ले : दापोली तालुक्यातील आसूद येथे शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेत आकर्षक खेळ करत केळशीच्या गजानन संघर्ष संघाने श्री झोलाई देवी कबड्डी चषकावर आपले नाव कोरले. लाडघरच्या औदुंबर कबड्डी संघाला व्दितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
आसूद येथील शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने यावर्षी ग्रामदेवता श्री झोलाई देवीच्या नावाने कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व संघांनी या स्पर्धेत खेळून उपस्थित क्रीडा रसिकांचे मनोरंजन केले. सहभागी संघांवर मात करून श्री विठ्ठल कबड्डी संघ, पाळंदे, शिवसाई वणंद, औदुंबर लाडघर व गजानन संघर्ष, केळशी आदी संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली.
पहिल्या उपांत्य फेरीचा सामना विठ्ठल पाळंदे व गजानन संघर्ष, केळशी यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात अखेरच्या काही क्षणात केळशी संघाने बहारदार खेळ करत पाळंदे संघावर विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वणंद व लाडघर या दोन्ही संघांनी आकर्षक खेळ करत उपस्थित कबड्डी रसिकांची मने जिंकली. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर लाडघरच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत सामना आपल्या बाजूने झुकविण्यात यश मिळवीत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात केळशीच्या व लाडघरच्या खेळाडूंकडून एकमेकांविरोधात आक्रमक व आकर्षक खेळ करत सामन्यात रंगत आणली. मध्यंतरापर्यंत आघाडीवर असणाऱ्या केळशी संघावर आक्रमण करत लाडघरच्या चढाईपटूनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, या अटीतटीच्या झालेल्या सामन्यात त्यांना यश मिळवता आले नाही. केवळ एका गुणाने गजानन संघर्ष, केळशीने हा सामना जिंकला व श्री झोलाई देवी कबड्डी चषकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या औचित्याने मंडळाकडून शिवशक्ती भूषण पुरस्कराचेही वितरण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावातील शिक्षण क्षेत्रासाठी बाळ शिगवण, कृषी पर्यटनासाठी मंगेश बंडबे, आदर्श ग्रामस्थ म्हणून रवींद्र कुळे, त्रिवेणी मल्लखांब पथकाचे दिलीप बांद्रे, आर्मीतील योगदानासाठी संदेश चव्हाण, कबड्डी क्षेत्रातील सुनील जगदाळे, वैभव रेवाळे, केदार जगदाळे, वर्षा धामणे व सूरज बांदे्र यांना शिवशक्ती भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी आसूद सरपंच विष्णू वारसे, रऊफ हजवाने, असलम अकबानी, बाळ शिगवण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघाचे अध्यक्ष दिलीप शिगवण, गाव अध्यक्ष वसंत शिर्के, अनंत बांद्रे, कानसे गुरूजी, राकेश माने, खेडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष वसंत रोवले, प्रभाकर बांदे्र, कार्याध्यक्ष रघुनाथ चव्हाण, प्रशिक्षक पांडुरंग धामणे, मंगेश रेवाळे, योगेश कांगणे, प्रफुल्ल बांद्रे, विजय बांदे्र, स्वप्नीला कानसे, निवास बांदे्र, चंद्रकांत बांदे्र, चंद्रकांत बोथरे, सुभाष बांदे्र यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)