कामथे रुग्णालयासाठी नगर परिषद कर्मचारी ठरले जलदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:50+5:302021-05-30T04:25:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : दरवर्षी उन्हाळा आला की कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई ठरलेलीच असते. कोरोनाच्या परिस्थितीतही पाणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : दरवर्षी उन्हाळा आला की कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाणी टंचाई ठरलेलीच असते. कोरोनाच्या परिस्थितीतही पाणी टंचाई कायम राहिल्याने त्याचा नाहक त्रास आरोग्य यंत्रणेला सुरू होता. याविषयीची दखल घेत नगर परिषद कर्मचारी या रुग्णालयाच्या मदतीला धावले. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने पाणी योजना राबवली. त्यामुळे या रुग्णालयाला मुबलक पाणी मिळत असून रुग्णांसह आरोग्य यंत्रणेची तहान भागली आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत कामथे येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. या रुग्णालयापासून काही अंतरावरच कामथे धरण आहे. तरीही रुग्णालयाला दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत टंचाईच्या झळा बसत होत्या. उन्हाळ्यात बोअरलवेलचे पाणी संपत असल्याने रुग्णालयात पाणी मिळत नव्हते. परिणामी टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. रुग्णालय प्रशासनाने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर काही दिवस नगर परिषदेने टँकरने पाणीपुरवठा केला. कोरोना कालावधीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व सामान्य कोविड रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कामथे रुग्णालयास पाणी योजना आवश्यक होती.
मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी ही बाब नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या कानावर घातली. त्यास कर्मचाऱ्यांनी तत्काळ होकार देत पाणी योजनेचे काम सुरू केले. त्यासाठी कामथे धरणाजवळ बोअरवेल मारली. त्यास उन्हाळ्यातही चांगले पाणी लागले आहे. तेथून रुग्णालयाच्या साठवण टाकीपर्यंत नवीन पाइपलाइन टाकली.
नगर परिषद कर्मचाऱ्यांनी हे स्वतः काम केले. पाणी योजनेचा सर्व खर्च उचलला. या योजनेसाठी सुमारे दोन लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र नगर परिषद कर्मचाऱ्यांनी पाणी योजनेसाठी बोअरवेल, साहित्य व मजुरीच्या माध्यमातून शासनाचा हा खर्च वाचवला आहे. सध्या या रुग्णालयात ८० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण नियमित उपचार घेत आहेत. त्यातच आता या रुग्णालयात सेमी आयसीयू कोविड सेंटर सुरू केले आहे. याशिवाय लवकरच या रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेतल्यास पालिका कर्मचाऱ्यांनी उभारलेली ही योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या या कार्याविषयी आमदार शेखर निकम, भास्कर जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
----------------------
चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.