कामथे रुग्णालयाचा ओपीडी कक्ष की श्वानांचे विश्रामगृह?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:50+5:302021-07-22T04:20:50+5:30
चिपळूण : येथील कामथे उपजिल्हा रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिले आहे. अशातच या ...
चिपळूण : येथील कामथे उपजिल्हा रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिले आहे. अशातच या रुग्णालयाच्या ओपीडी कक्षातील एका खोलीत रुग्णांसाठी असलेल्या बेडवर चक्क श्वान विश्रांती घेत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकाराविषयी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त होत आहेत.
सध्या कोविड रुग्णांसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालय मोठा आधार ठरला आहे. या रुग्णालयात १२० हून अधिक बेड असून, तिथे नेहमी ८० ते ९० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय या रुग्णालयातील ओपीडीही नित्यनेमाने सुरू आहे. मागील आठवड्यात याच रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रिकामा ऑक्सिजन सिलिंडर जोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या गंभीर प्रकाराची चर्चा सुरू असतानाच आता श्वान बेडवर विश्रांती घेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेला दरवाजा कायम उघडा असतो. तेथील लोखंडी दरवाजा गंजल्याने तो काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मागील प्रवेशद्वार कायम उघडे राहते. त्यातून श्वास आतमध्ये प्रवेश करतात व रुग्णालयात त्यांचा मुक्तसंचार असतो. आता हे श्वान रुग्णांसाठीच्या बेडवरच विश्रांती घेऊ लागल्याने चिंता वाढली आहे.
आतापर्यंत या रुग्णालयाला लागणाऱ्या सोयी सुविधा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या आहेत. अगदी स्वच्छतागृहात लागणारी झाडू व बादलीही पुरवण्यात आली आहे. तरीही व्यवस्थापन रुग्णालयाच्या वास्तूकडे फारसे लक्ष देत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
...............................
कामथे उपजिल्हा रुग्णालयात घडलेला प्रकार हा अत्यंत निंद्यनीय व रुग्णांच्या जिवाशी खेळणारा आहे. मुळात ज्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला, त्यांनी हा प्रकार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्यायला हवे होते. तसेच या विषयीची तक्रार आली असती, तर त्यावर उपाययोजना वेळीच करता आल्या असत्या. कामथे रूग्णालय हे गोरगरिबांचे रुग्णालय असल्याने या रुग्णालयाची नेहमी बदनामी केली जाते. त्यामुळे ही बाजूही पडताळून घ्यायला हवी. त्यातच भरमसाठ पगारदार असलेले अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नसल्याने हे प्रकार घडत आहेत.
तानू आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण.
200721\03011825-img-20210720-wa0040.jpg
कामथे रूग्णालयाचा ओपीडी कक्ष की श्वानांचा विश्रामगृह