कणकवली नगराध्यक्षांसह दोघांना सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 04:32 AM2019-09-06T04:32:31+5:302019-09-06T04:32:37+5:30
डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती.
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेचे तत्कालीन आमदार परशुराम उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी कणकवलीचे विद्यमान नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत या दोघांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी गुरुवारी सायंकाळी ठोठावली. या खटल्यातील उर्वरित ४४ संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
डिसेंबर २०११ मध्ये झालेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. याचा राग मनात धरून राणे समर्थकांच्या जमावाने शिवसेनेच्या वेंगुर्ला सुंदर भाटले परिसरात असलेल्या शाखेवर काचेच्या बाटल्या व दगडफेक करीत तेथील गाड्यांची तोडफोड केली होती. तसेच या शाखेत बसलेल्या तत्कालीन आमदार परशुराम उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. विविध कलमान्वये त्यामधील संजय पडते, काका कुडाळकर, समीर नलावडे, संदेश सावंत, संजू परब यांच्यासह ४७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गेली सहा वर्षे हा खटला चालला.