कर्दे समुद्रात गाडीला जलसमाधी
By admin | Published: September 13, 2014 11:32 PM2014-09-13T23:32:41+5:302014-09-13T23:32:41+5:30
सुदैवाने सहा पर्यटक बचावले
दापोली : कोकणातील पावसाने विश्रांती देताच निसर्गसौंदर्य व समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात येऊ लागल्याने समुद्रकिनारे गजबजू लागले आहेत. पुणे येथील काही पर्यटक किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी कर्दे येथे एका रिसॉर्टमध्ये उतरले. शनिवारी सकाळी सफारी गाडीतून समुद्र किनाऱ्याची सफर करताना गाडी पुळणीत रुतली. अचानक समुद्राला भरती सुरु झाल्याने गाडी सोडून पर्यटकांना बाहेर पडण्याचा सल्ला स्थानिकांना दिल्याने गाडीतील पर्यटक बचावले. मात्र गाडीला जलसमाधी मिळाली. गणेशोत्सवानंतर पाऊस कमी झाल्याने कोकणात पर्यटक येऊ लागले आहेत. पाऊस कमी झाला असला तरी अजूनही समुद्र शांत झालेला नाही. परंतु काही अतिउत्साही पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरु लागले आहेत. काहीजण आपल्या गाडीने समुद्राची सफर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र समुद्राची पुळण अजूनही भुसभुशीत असल्याने किनाऱ्यावर गाडी चालविणे धोक्याचे आहे. मात्र, ते पर्यटकांना सांगून पटत नाही. स्थानिकांनी पर्यटकांना गाडी किनाऱ्यावर चालवू नका, असे सांगितले होते तर अतिखोल पाण्यात उतरु नका, असाही सल्ला दिला होता. परंतु, स्थानिकांचा सल्ला न ऐकताच पर्यटकांनी गाडी कर्दे समुद्रकिनाऱ्यावर घातली. थोड्यावेळात गाडी वाळूत रुतली. गाडीला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही स्थानिकांनीसुद्धा गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली. परंतु समुद्राला भरती सुरु झाल्याने गाडी पाण्यात बुडू लागली. दुपारी १२ वाजेपर्यंत गाडी समुद्रात दिसत होती. परंतु दुपारी १२ नंतर गाडीला समुद्रात पूर्णपणे जलसमाधी मिळाली.
अतिउत्साहाच्या भरात समुद्राच्या पाण्यात पर्यटक घुसू लागल्याने अनेक ठिकाणी जीवितहानी होत आहे तर काही ठिकाणी गाड्यासुद्धा समुद्रात बुडाल्याच्या घटना घडत आहेत. कर्दे समुद्रकिनाऱ्यावर गाडीला जलसमाधी मिळाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत गाडीचा अर्धा भाग दिसत होता. स्थानिक पातळीवर हालचाली केल्या असत्या तर गाडीला बाहरे काढता आले असते.
सागरी सुरक्षा रक्षक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र समुद्राच्या भरतीने गाडीला काढण्यात अपयश आले. या घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत हेही घटनास्थळी पोहोचले. (प्रतिनिधी)