करंबेळे गाव अजूनही अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:06+5:302021-05-21T04:32:06+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गाव सलग चौथ्या दिवशीही अंधारात आहे. वादळामुळे विद्युत वाहिन्यांवर वृक्ष पडल्याने चार वीजखांब तुटून ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे गाव सलग चौथ्या दिवशीही अंधारात आहे. वादळामुळे विद्युत वाहिन्यांवर वृक्ष पडल्याने चार वीजखांब तुटून पडले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे़
तालुक्यातील करंबेळे गावाला कोसुंब येथून थ्रीफेज वाहिनी जोडण्यात आली आहे. रविवारी झालेल्या तुफान वादळाचा फटका करंबेळे गावातील महावितरणला जास्त बसला आहे.
करंबेळे सुतारवाडी यादरम्यान सविता पवार यांच्या घराच्या समोर काही अंतरावर आंब्याचे झाड वाहिनीवर आणि तिथून काही अंतरावर दुसऱ्या खांबाच्या दरम्यान मोठ्या वाडाचे झाड रविवारी पडले होते. त्यामुळे विद्युत वाहिन्या आणि चार वीज खांब तुटून पडले आहेत. हे तुटलेले चार वीज खांब नव्याने टाकल्याशिवाय या वाहिन्या ओढता येणे अशक्य बनले आहे. मात्र, चार दिवस झाले तरीही अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. याबाबत कोसुंब विभागाच्या कनिष्ठ अभियंता यांच्याशी बुधवारी दिवसभर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ होता. रविवारी खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी रात्रीपर्यंत पुरवत होऊ शकला नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.