काेराेनाने काढलं दिवाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:03 AM2021-06-12T04:03:59+5:302021-06-12T04:03:59+5:30
बंडोपंतासमोर आमची एवढी मोठी बेइज्जती झाल्याने आमचा चेहरा पडला. तसे बंडोपंत खीऽ खीऽ हसून म्हणाले, ‘आमच्याही घरात रोज हेच ...
बंडोपंतासमोर आमची एवढी मोठी बेइज्जती झाल्याने आमचा चेहरा पडला. तसे बंडोपंत खीऽ खीऽ हसून म्हणाले, ‘आमच्याही घरात रोज हेच बोल ऐकतो. त्यामुळे वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यासाठी थोडं दुर्लक्ष करायला शिकायचं राव.’ मग आम्हाला जरा हायसं वाटलं. बंडोपंत सांगू लागले, ‘काय झालंय माहीत आहे का, या कोरोनाच्या काळात एवढं २४ तास घरी राहून एकमेकांच्या समोर आल्याने घरगुती भांडणं वाढलीत. तुम्ही एवढी काळजी करू नका. तरी बरं तुमच्या घरात एवढं बोलून भांडणाचा कार्यक्रम स्टॉप होतो. पण काही काही घरात तो महिनोन् महिने चालतो. ते जाऊ दे सकाळी काय घडलं ते सांगायला आलोय.’ म्हटलं सांगा. तसे बंडोपंत डॅनीसारखी पोझ घेऊन म्हणाले, ‘परवा जरा खोकला येत होता, शिंका आलेल्या.’ तर बायको म्हणाली, ‘टेस्ट तरी करून बघा. मग काय गेलो एका खासगी डॉक्टराकडे. तर त्यांनी टेस्ट करायची फी सांगितली ५०० रुपये. आता एवढे पैसे देऊन कशाला लचांड मागे लावून घ्यायचं म्हणून मी हळूच गेलो डॉक्टरांच्या जवळ. मास्क काढला नि त्यांच्या तोंडावर शिंकलो.’ आम्ही तर उडालोच, बंडोपंतांचे हे धाडस ऐकून. आमचा चेहरा न्याहाळत पुढे म्हणाले, ‘आता तुम्ही म्हणाल याने काय होणार, तर सांगतो. एकतर ते डॉक्टर टेस्ट करतील. मी त्यांच्या मागावर राहीन. समजा ते निगेटिव्ह निघाले तर आपले ५०० रुपये वाचले आणि दुर्दैवाने ते पॉझिटिव्ह निघालेच तर तुम्हालाही माझ्यासोबत सरकारी दवाखान्यात यावे लागेल. तसे आम्ही पार घाबरून गेलो. आमचा घाबरलेला चेहरा पाहून बंडोपंत म्हणाले, ‘घाबरू नका. मी तीन मास्क लावलेत आणि तात्यांची उरलेली दारू हाता-पायाला लावलीय. काेरोनाचे किडे त्या दारुच्या वासाने बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडले असतील.’ बंडोपंताचे हे बोलणे ऐकून आम्ही काय बोलवे तेच कळेना.
तेवढ्यात सौभाग्यवती तरा तरा बाहेर येत म्हणाल्या, ‘का वो बंडोपंत भाऊजी जळं त्या पाचशे रुपयासाठी एवढं रामायण केलंत. जरा जगाची नाही तर मनाची तरी लाज बाळायची !’ तसे बंडोपंत नरमाईच्या सुरात म्हणाले, ‘तसं नाय वो वहिनीसाहेब, मला व्हायरल सर्दी पडसं झालेलं. म्हणून गंमत केली. तुम्ही मनावर घेऊ नका.’ तसे आम्ही म्हणालो, ‘पण बंडोपंतराव समजायला मार्ग नाही की या चायनिज नकट्यांनी तयार केलेली लाईटची माळ एक दिवाळी टिकली नाही पण या नकट्यांनी तयार केलेला कोरोना विषाणू किती दिवाळ्या टिकतोय कोणास ठावूक.’ तसे बंडोपंत म्हणाले, ‘किती दिवाळ्या कोरोना टिकतो माहीत नाही पण आमचं मात्र दिवाळं काढलंय. म्हणून तर राव ५०० रुपये टेस्टसाठी खर्च नाही केले. आता आम्हाला दिवाळं निघाल्यावर काय होतं ते कळलं.’
- डॉ. गजानन पाटील