कर्नाटक राज्यातील बसला दोन दिवसांत मिळणार हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:05+5:302021-09-23T04:36:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र, शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात आंतरराज्य वाहतुकीला ब्रेक मिळाला होता. मात्र, शासनाच्या परवानगीने पुन्हा वाहतूक सुरू झाली होती; परंतु अतिवृष्टीमुळे आंबा घाट खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. येत्या दोन दिवसांत आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
रत्नागिरी विभागातून कर्नाटक व गोवा राज्यात प्रवासी वाहतूक सुरू आहे. कर्नाटक राज्यातून व रत्नागिरी विभागातून दिवसाला प्रत्येकी दहा बस धावतात. शिवाय पणजी-रत्नागिरी बस सुरू होती. कोरोनामुळे एप्रिलमध्ये लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती; परंतु शासनाच्या सूचनेनुसार जूनमध्ये राज्यांतर्गत वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. रत्नागिरी विभागातून विजापूर, सिंदगी, हुबळी मार्गावर, तसेच कर्नाटक राज्यातून रत्नागिरी विभागात बस सुरू होत्या; परंतु जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा घाट खचल्यामुळे वाहतुकीला पुन्हा ब्रेक लागला होता. दोन्ही विभागातून पुन्हा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. पणजी गाडी लवकरच सुरू होणार आहे.
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
नोकरी, व्यवसायासाठी कर्नाटक, गोवा राज्यातील अनेक लोक जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. शिवाय जिल्ह्यातील काही लोक अन्य राज्यांत वास्तव्यास आहेत. कोल्हापूरमार्गे कर्नाटक राज्यातील गाड्या ये-जा करीत असल्यामुळे या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर, मिरज याठिकाणी जाण्यासाठी दवाखाने व अन्य कामासाठी ये-जा सुरू असते. यामुळे या मार्गावरील गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
८० टक्के वाहक चालकांचे लसीकरण पूर्ण
रत्नागिरी विभागातून ६७७ वाहक, ६७६ चालक, १३६६ चालक कम वाहक असून, ८० टक्के चालक, वाहकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परराज्यात बस घेऊन जाणाऱ्या चालक, वाहकांसाठी लसीकरण सक्तीचे असल्यामुळे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर आहे.
जुलैपासून आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या अणुस्कूरमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. अंतर वाढत असल्याने तिकीट दरात वाढ होते. कर्नाटक मार्गावरील बससाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. प्रवाशांच्या मागणीनुसार येत्या दोन दिवसांत या गाड्या सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.
- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी
परराज्यात जाणाऱ्या बस
रत्नागिरी- विजापूर
रत्नागिरी- बेळगाव
चिपळूण- बेळगाव
रत्नागिरी-हुबळी
संगमेश्वर- बेळगाव