जिल्हा जोडणारे कशेडी व रघुवीर घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:47+5:302021-06-06T04:23:47+5:30

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा तालुक्यातील कशेडी घाट पावसाळ्यात नेहमीच वाहनचालकांना डोकेदुखी ठरतो. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ...

Kashedi and Raghuveer Ghats connecting the district | जिल्हा जोडणारे कशेडी व रघुवीर घाट

जिल्हा जोडणारे कशेडी व रघुवीर घाट

googlenewsNext

रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडणारा तालुक्यातील कशेडी घाट पावसाळ्यात नेहमीच वाहनचालकांना डोकेदुखी ठरतो. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून हा घाट ओळखला जातो. २२.५ किलाेमीटर लांबीचा कशेडी घाट तीव्र उतार, नागमोडी वळणे यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी नेहमीच वाहनचालकांना त्रासदायक ठरला आहे. पावसाळ्यात वारंवार कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता अशी ओळख कशेडी घाटाची झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरपासून कशेडी घाटाला सुरुवात होते. हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील खवटी गावात संपतो. या घाटमाथ्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढलेली अवजड व प्रवासी वाहनांची संख्या, अवजड वाहतूक आणि निसर्गाचा कोप यामुळे हा घाट अतिधोकादायक झाला आहे. पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे असे प्रकार नेहमीच होत असतात.

रायगड जिल्ह्यातील भोगाव गावच्या हद्दीत कित्येक वर्षांपासून कोसळलेल्या दरडींमुळे १५० मीटर अंतराचा रस्ता खचला आहे. जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धामणदेवी व भोगावच्या हद्दीत कोसळलेल्या दरडींमुळे हा मार्ग तब्बल १२ दिवस बंद होता. २०११मध्येही ऐन गणेशोत्सवात तीन आणि चार ऑगस्टला खेड तालुक्यातील हद्दीत येणाऱ्या घाटातील भागात तीनवेळा मोठ्या दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता. दरवर्षी रायगड जिल्ह्यातील धामणदेवी व भोगावच्या हद्दीत रस्ता वाहून जाणे, खचणे व दरडी कोसळणे असे प्रकार घडत असल्याने पावसाळ्यात जीव मुठीत धरूनच वाहनचालक प्रवास करत असतात. मुसळधार पावसाच्या काळात भोगाव ते कशेडी - दरेकरवाडीपर्यंतचा कशेडी घाटाचा भाग हा आजही धोकादायक आहे. महाड महामार्ग बांधकाम विभागाकडून भोगाव गावच्या हद्दीत खचणारा रस्ता दरवर्षी दुरुस्त करण्यात येतो, परंतु हा रस्ता पुन्हा पुन्हा खचतो. घाटातील अवघड व धोकादायक वळणावर अनेकदा अवजड वाहने अपघातग्रस्त होत असतात. पावसाळ्यात कशेडी घाटात दाट धुके पसरते. यासाठी मार्गावरील दिशादर्शक फलक, कॅटआय्स, सूचना फलक, दुभाजक व साईडपट्टी, पांढरेपट्टे अशाप्रकारच्या वाहनचालकांना संभावित धोक्याची जाणीव करून देणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

कशेडी घाटाला पर्यायी ठरणाऱ्या महाड-राजेवाडी-विन्हेरे-नातूनगर या मार्गावरून कशेडी घाटातील वाहतूक बंद झाल्यास पर्यायी वाहतुकीची व्यवस्था केली जाते. २००५च्या अतिवृष्टीवेळी कशेडी घाट कोसळल्यामुळे या मार्गाचे महत्त्व लक्षात आले होते. २०१९मध्ये या मार्गावर ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत फाळकेवाडीजवळ भगदाड पडले होते. यामुळे कित्येक दिवस या पर्यायी मार्गावरील वाहतूक बंद होती. कशेडी घाटाला पर्यायी व्यवस्था म्हणून पाहिले जात असले तरी हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाढणाऱ्या पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

----------------------

रत्नागिरी - सातारा जिल्ह्यांना जाेडणारे दाेन रस्ते

रत्नागिरी - सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे दोन रस्ते खेड तालुक्याच्या हद्दीतून पुढे जातात. रघुवीर घाटमार्गे सातारा आणि हातलोट घाटमार्गे सातारा असे हे दोन मार्ग आहेत; परंतु या दोन्ही रस्त्यांवर वनखात्याची जमीन आहे. यापूर्वी वनखात्याने परवानगी दिली असती तर हे दोन्ही मार्ग सातारा जिल्ह्याला कधीच जोडले गेले असते. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रघुवीर घाटातील अवघड वळणावर दोन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडल्या आहेत. २०११मध्ये पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे हा घाट तब्बल चार दिवस बंद होता. या घाटाचा प्रस्ताव १९९०मध्ये तयार करून १९९३मध्ये हा घाट सुरू करण्यात आला.

-------------------------------

रघुवीर घाटात मजबुतीकरण व्हावे

दरवर्षी डागडुजीच्या नावाखाली रस्त्याचे डांबरीकरण केले जाते. मात्र, पावसाळ्यात ते वाहून जात आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या हद्दीत वसलेल्या २१ गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घाटात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स मोडलेल्या अवस्थेत आहेत. दरवर्षी घाटात काही विशिष्ट भागात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या कालावधीत दरड कोसळल्यास रस्ता पूर्ववत करण्यासाठी बांधकाम विभागाकडून खोपी येथे जेसीबी उपलब्ध करून देण्यात येतो. वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रघुवीर घाटात रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

----------------------------

अपुरे पाेलीस कर्मचारी

कशेडी घाटातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कशेडी बंगला येथे वाहतूक पोलीस चौकी असली तरी या शाखेकडे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. कशेडी घाटात रस्त्यावर रसायन वाहतूक करणारे अवजड टँकर, ट्रक, ट्रेलर यासारखी अवजड वाहने अपघातग्रस्त होऊन मध्यभागी किंवा डोंगरबाजूला कलंडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी किमान पाच तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या दरम्यान मुंबई व गोवा अशा दोन्ही दिशेला पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेकडो वाहनांच्या रांगा लागून कित्येक तास वाहने अडकून पडतात.

--------------------------

पाेलीस विभागाची क्रेन बंदच

कशेडी घाटात अपघाताची घटना मध्यरात्रीच्या दरम्यान घडली तर अडकून पडलेल्या वाहनातील प्रवाशांना रात्रीच्या निर्जन ठिकाणी मदतही वेळेवर मिळत नाही. रस्त्यावरील कलंडलेले किंवा दरीत कोसळलेल्या वाहनाला उचलण्यासाठी क्रेन्स लागतात. अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाची क्रेन आहे, मात्र ऑपरेटर नसल्याने गेली अनेक वर्षे ही क्रेन बंद आहे. त्यामुळे पोलिसांना मदतकार्यात, आपत्तीकाळात वाहतूक नियंत्रणात अडचणी निर्माण होतात.

Web Title: Kashedi and Raghuveer Ghats connecting the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.