कशेडी बोगद्यांचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:38 AM2021-06-09T04:38:57+5:302021-06-09T04:38:57+5:30
खेड : नैसर्गिकदृष्टय़ा धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायन वाहतूक करणाऱ्या वाहनांची डोकेदुखी ठरलेल्या मुंबई - ...
खेड : नैसर्गिकदृष्टय़ा धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायन वाहतूक करणाऱ्या वाहनांची डोकेदुखी ठरलेल्या मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास पूर्णत्वास जात असलेल्या दोन स्वतंत्र बोगद्यांमुळे लवकरच आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. जवळपास पावणे दोन किलाेमीटरपैकी केवळ तीनशे मीटर बोगद्यांचे काम शिल्लक राहिले आहे. पोलादपूरच्या दिशेने दोन्ही बोगद्यांचे एक किलोमीटर अंतराचे काम पूर्णत्वास गेले आहे. खेडच्या दिशेने दोन्ही बोगद्यांचा सुमारे अर्धा किलोमीटर अंतराचा टप्पा पूर्णत्त्वाला गेला आहे.
तत्कालिन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २६ जानेवारी २०१९ला या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. या घाटातील दोन्ही स्वतंत्र येण्या-जाण्याच्या मार्गिका मिळून ३.४४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम सुरु आहे. तालुक्यातील खवटी येथून हे काम सुरू झाल्यानंतर आजमितीस साधारणपणे १४०० मीटर अंतराचा जाण्या-येण्याचा असा भुयारी मार्ग झाला आहे. कशेडी घाटातील हा बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यामध्ये ७.२ किलोमीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी ५०२.१५ कोटी रुपये खर्च येणार असून, पावणेदोन किलोमीटरचे एकदिशा मार्गाचे वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत. या बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन अशा एकूण सहा लेन असणार आहेत.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट महत्त्वाचा पण तितकाच धोकादायक मानला जातो. तो पार करण्यासाठी वाहनांना चाळीस मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, नवीन बोगद्यामुळे केवळ ९ मिनिटात हा घाट ओलांडता येणार आहे. सध्या या बोगद्याचे दोन्ही बाजूंनी जोरात काम सुरू असून, केवळ ३० महिन्यांमध्ये दोन्ही भुयारी मार्गांचे काम पूर्ण केल्यानंतर बोगद्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे कामही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार आहे.
———————————
वायूविजन सुविधेचे एक भुयार
आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायूविजन सुविधेचे एक भुयारही यामध्ये समाविष्ट असून, पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणाऱ्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला आहे. आतील भागात परत यू टर्न घेणाऱ्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे तर आपत्कालासाठी वायूविजन सुविधेचे एक भुयारही समाविष्ट आहे.