केतकीत एस. आर. तंत्रज्ञान मार्गदर्शन
By admin | Published: June 16, 2015 11:20 PM2015-06-16T23:20:19+5:302015-06-17T00:37:54+5:30
दादा गरंडे : कोकणातील शेतकऱ्यांना भात लागवडीतील तंत्राच्या टीप्स दिल्यास फायदा
चिपळूण : कोकणामध्ये खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भातपीक पद्धतीत बदल सुचवण्यात आहेत. जमिनीची उकल, बेर आणि चिखलणी करून लावणी न लावता गादी वाफ्यावर भात बियाण्याची टोकणी केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचे सगुण भात लागवड तंत्र कोकणातील शेतकऱ्यांना फायदेशीर असल्याचे मत कालुस्ते विभागाचे कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी व्यक्त केले.
एस. आर. तंत्रज्ञानाबाबत कृषी सहाय्यक दादा गरंडे हे केतकी येथे माहिती देत होते. भातलागवड जून महिन्यात पूर्ण करण्याची असून, पीक वाढीच्या कालावधीत पावसाचे प्रमाण कमीजास्त झाले तरी उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त मिळते. चिखलणी व लावणी करावी लागत नसल्यामुळे उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्के बचत होते. तसेच बियाणे पेरणीनंतर निवडक तणनाशक गोल किंवा अॅक्झट्रिजीन वापर केल्यास तणाचा प्रादुर्भाव अत्यल्प राहतो. तसेच भात कापणीनंतर त्याची मुळे जमिनीत राहून कुजल्याने सेंद्रीय घटकाचे प्रमाण वाढते व जमिनीचा पोत व प्रत वाढते. ज्या ठिकाणी पाण्याची रब्बी व उन्हाळी हंगामात सुविधा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी कडधान्यवर्गीय भाजीपाला पिके घेऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रथम पाच ते दहा गुंठे प्रक्षेत्रावर प्रयोग केल्यास आत्मविश्वास वाढून पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर एस. आर. तंत्रज्ञानाने लागवड होईल, असा विश्वास गरंडे यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी पर्यवेक्षक एस. एस. मिरगावकर, सचिन भागणे, अनंत भागणे, सूर्यकांत गोलमडे, विरेंद्र कांबळे, विठ्ठल भागणे, सुरेश गोलमडे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
खरिपाच्या भातपीक पध्दतीत बदल सुचविण्यावर भर.
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी सगुण भात लागवड फायदेशीर.
चिखलणी, लावणी करावी लागत नसल्याने उत्पादन खर्चात बचत.
भातलागवड जूनमध्ये पूर्ण करावी.