खाडीपट्टा परिसर अविकसितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 10:35 PM2016-03-29T22:35:41+5:302016-03-30T00:06:35+5:30

ग्रामस्थांची मागणी : नंदनवन नको, निदान सोयी सुविधा द्या

Khadi Patta area underdeveloped | खाडीपट्टा परिसर अविकसितच

खाडीपट्टा परिसर अविकसितच

Next

खेड : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सुमारे २३ गावे मूलभूत सोयी व सुविधांपासून वंचित राहिली आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा भाग अविकसित राहिला आहे. येथील रस्ते तर सतत वाळूच्या वाहतुकीने पूर्णपणे उखडले आहेत. पाण्याअभावी येथील जनतेचे हाल होत आहेत. आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांनी या विभागाच्या विकासासाठी केलेल्या घोषणा निष्प्रभ ठरल्याने सुमारे २३ गावे असलेला हा विभाग अद्याप अविकसित राहिला आहे. या विभागाचे ‘नंदनवन नको निदान मूलभूत सोयी सुविधा द्या’ अशी ओरड येथील जनतेची माफक अपेक्षा आहे.
निसर्गाने नटलेला खाडीपट्टा विभाग पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. परिसर निसर्गसंपन्न आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अनेकवेळा या विभागाला सोसावा लागला. वर्षभर वाहणारी जगबुडी नदी आणि जोडीलाच दाभोळ खाडी यामुळे या विभागातील मत्स्य व्यावसायिक आणि वाळू व्यावसायीक आपला जेमतेम उदरनिर्वाह करीत आहेत. येथील जंगलमय भागात असलेली जैवविविधता आणि औषधी वनस्पती हे या विभागाचे खास वैशिष्ट्य आहे. नदी आणि खाडी किनारी असलेल्या झोपड्या तसेच वस्त्या आजही अविकसित आहेत. जगबुडी नदी, दाभोळ खाडी आणि वाशिष्ठी नदीच्या संगमावरच बहीरवली येथे मुघलकालीन दिवा बेट आहे. निसर्गप्रेमी आणि जलपर्यटन प्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे.़ खाडीपट्ट्यातील दुर्लक्षित राहिलेला हा भूभाग आणि येथे असलेले ऐतिहासिक अवशेष पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे आहेत. हा गावचा मोठा ठेवा आहे. तो जतन करून विकसित करण्याच्या दृष्टीने पर्यटन विभागाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
हिंदू व मुस्लिम धर्मिय लोक येथे सलोख्याने राहतात, ही या विभागाची स्वतंत्र ओळख आहे. खेड शहरापासून सुमारे २५ ते ३५ किलोमीटर अंतरावर हा विभाग विस्तारल्याने शिक्षणाच्या तशा सुविधा कमी आहेत. उन्हाळ्यातही जगबुडी नदी आणि खाडीतील पाण्यामुळे या विभागात गारवा वाटतो. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ आणि दाट वनराई यामुळे खाडीपट्ट्याकडे पर्यटकांनाही पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल, त्यादृष्टीने विभागातील २३ गावांतील ४५ हजार लोकवस्तीसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अगत्याचे आहे. (प्रतिनिधी)

घोषणा हवेतच : पर्यटनस्थळ सोडाच; मूलभूत सुविधाही नाहीत
खाडीपट्टा विभाग आता गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांनी निवडणुकीवेळी एका जाहीर सभेत हा विभाग पर्यटनस्थळ करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र पर्यटनस्थळ सोडाच, या विभागात मूलभूत सोयीसुविधाही नाहीत. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या दिवा बेटापर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ता नाही, तसेच पन्हाळजे मार्गाची कमालीची दुरवस्था झाली आहे.

वाळू उत्खनन
नदीकिनारच्या वस्त्यांकडे ये-जा करणेसाठी रस्ते, पाणी व दळणवळणाच्या अन्य सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे कोणी पर्यटक या बेट किंवा पन्हाळजेपर्यंत फिरकत नाहीत. या विभागातील अमर्याद वाळू उत्खननामुळे हा परिसर वाळूमाफियांचा भाग म्हणून नवीन ओळख होत आहे.

Web Title: Khadi Patta area underdeveloped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.