खडपोली ग्रामपंचायतीने उभारले स्वतःचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:32+5:302021-05-18T04:32:32+5:30
चिपळूण : तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर पहिल्यांदाच कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. गावातील लोकांच्या हितासाठी खडपोली ग्रामपंचायतीने स्वतःचे कोविड ...
चिपळूण : तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर पहिल्यांदाच कोविड केअर सेंटर सुरू झाले आहे. गावातील लोकांच्या हितासाठी खडपोली ग्रामपंचायतीने स्वतःचे कोविड केअर सेंटर सुरू केले. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावातीलच दोन डॉक्टर सेवा देणार आहेत. शिवाय मोफत जेवनासह औषधोपचार आणि आवश्यकतेवेळी रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था आहे. स्वतःचे कोविड सेंटर करणारी खडपोली ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खडपोली कोविड केअर सेंटरचे सोमवारी उद्घाटन झाले. सेंटरसाठी गावातील जिल्हा परिषद शाळा ताब्यात घेतली. सेंटरची प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी या सेंटरची पाहणी करून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले होते. गावात अजूनही कोरोना बाधित रुग्ण आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना या कोविड सेंटरसाठी उपचार केले जाणार आहे. येथे वैद्यकीय सेवा देण्यासाठी खडपोलीतील दोघा डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकीतून पुढाकार घेतला आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रुग्णांना मोफत औषधोपचार केला जाणार आहे. एखाद्या रुग्णास तातडीने ऑक्सिजन हवा असल्यास ऑक्सिजनचा साठाही उपलब्ध केलेला आहे.
या सेंटरसाठी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेऊन आदर्शवत पाऊल टाकले आहे. गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची वेगळी व्यवस्था करावी. यासाठी हे सेंटर सुरू केले आहे. या सेंटरसाठी सरपंच नेहा खेराडे, उपसरपंच मंगेश गोटल, ग्रामसेवक रोहिदास हांगे, सदस्य महेश मोहिते, अक्षया तांबट, सारिका भुवड, अक्षता कदम, राजेश पवार, तुकाराम कदम, सारिका चांदीवडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.
------------------------------------
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील कोविड सेंटरचे उद्घाटन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ज्योती यादव, विनोद झगडे आदी उपस्थित होते.