खालगाव - जाकादेवी परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 AM2021-06-28T04:22:01+5:302021-06-28T04:22:01+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढल्यामुळे खालगाव परिसराला कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव - जाकादेवी परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढल्यामुळे खालगाव परिसराला कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. कन्टेनमेंट झाेन जाहीर करताच खालगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून पाच पथकांच्या सहाय्याने जाकादेवी परिसरातील नागरिकांच्या सरसकट कोरोना चाचणीला रविवारी सकाळपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
खालगाव कन्टेनमेंट झोनमुळे बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जोपर्यंत रुग्णसंख्या शून्य होत नाही, तोपर्यंत हा परिसर कन्टेनमेंट म्हणूनच राहणार आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जाकादेवी - खालगाव परिसरात विलगीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, रत्नागिरी यांच्याकडून खालगाव ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.
खालगावमध्ये १०६पैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, १०३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात खालगाव, तरवळ, बोंड्ये, देऊड, लाजूळ, करबुडे इत्यादी सहा उपकेंद्र आहेत. जाकादेवी आरोग्य केंद्रांतर्गत २६,१८५ एवढी या भागात लोकसंख्या आहे. या लोकसंख्येपैकी सुमारे ४ हजार ग्रामस्थांना कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. अजूनही सुमारे वीस हजार ग्रामस्थांचे लसीकरण होणार आहे. ग्रामस्थांनी मनातील भीती बाजूला करून कोरोना चाचणीसाठी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन खालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे यांनी केले आहे.
------------------------------
आत्तापर्यंत सुमारे चार हजार लोकांना कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. मर्यादित डोस उपलब्ध होत असल्यामुळे लसीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असले तरी भविष्यात जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करण्यावर भर राहणार आहे. खालगाव रेड झोन झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.
- डॉ. महेश मोरताडे, वैद्यकीय अधिकारी, जाकादेवी प्राथमिक आराेग्य केंद्र
---------------------------
खालगाव भागात रुग्णसंख्या शून्य होत नाही, तोपर्यंत कन्टेनमेंट झोन सुरू राहील. कोविड संसर्ग वाढू नये यासाठी खालगाव ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी यांच्या सहाय्याने जाकादेवी-खालगाव या दीड किलोमीटरच्या लोकवस्तीत सरसकट कोरोना चाचणीसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
- प्रकाश खोल्ये, सरपंच
----------------------------
जाकादेवी-खालगाव परिसरात पथकाद्वारे घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या पथकासोबत सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर सहभागी झाले आहेत. (छाया : संतोष पवार)