खालगाव जाकादेवी बाजारपेठ अजूनही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:17+5:302021-07-07T04:39:17+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी परिसरामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने प्रशासनाने खालगाव-जाकादेवी परिसराला कन्टेन्मेंट झाेन जाहीर केला आहे. या ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी परिसरामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने प्रशासनाने खालगाव-जाकादेवी परिसराला कन्टेन्मेंट झाेन जाहीर केला आहे. या कालावधीमध्ये जाकादेवी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
खालगाव-जाकादेवी मुख्य बाजारपेठ शनिवार दि. २६ जूनपासून बंदच आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. खालगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी यांच्या सहकार्याने खालगाव जाकादेवी जास्त लोकवस्तीच्या दीड किलोमीटरच्या परिसरातील सुमारे १,४५० एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे चाचणीत सिद्ध झाले. अशा पॉझिटिव्ह रुग्णांवर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत.
एप्रिल महिन्यापासून शंभरपेक्षा अधिक रुग्ण जाकादेवी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली. शिवाय अलीकडच्या कालावधीत सुमारे ३५ रुग्ण परिसरात पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनाने खालगाव जाकादेवी परिसराला कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला. परिसरातील नागरिकांच्या कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.
गेले दहा दिवस जाकादेवी मुख्य बाजारपेठ बंद राहिल्याने ग्राहकांना खरेदी-विक्रीसाठी बाजाराविना घरी थांबावे लागत आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांचे सहकार्य दिले. जाकादेवी-खालगाव परिसर कन्टेन्मेंट झाेनमधून मुक्त व्हावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत खालगाव अधिक प्रमाणात मेहनत घेत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर व सदस्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरदा कदम आणि त्यांची सर्व टीम मेहनत घेत आहेत.