आरोग्य विभागावर खलिफेंची सडकून टीका

By admin | Published: August 3, 2016 12:53 AM2016-08-03T00:53:35+5:302016-08-03T00:53:35+5:30

विधानपरिषदेत चर्चा : अतिरिक्त कामामुळे डॉक्टर्स मानसिक तणावाखाली

The Khalifeni Stalker Commentary on the Health Department | आरोग्य विभागावर खलिफेंची सडकून टीका

आरोग्य विभागावर खलिफेंची सडकून टीका

Next

 राजापूर : महाराष्ट्र विधान परिषद नियम २६० अन्वये आरोग्य खात्यावर विधान परिषदेत चर्चा करीत असताना आमदार हुस्नबानू खलिफे यांनी राज्य शासनाच्या आरोग्य खात्यावर सडकून टीका केली.
राज्यात रुग्णांची संख्या बेसुमार वाढत असून, त्यामानाने डॉक्टरांची संख्या वाढत नसल्याने डॉक्टर्स मानसिक तणावाखाली असतात. १६ ते १८ तास काम करावे लागते. अशातच त्यांना इतर सोयी सुविधा मिळत नाहीत आणि डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मेडिकल कौन्सिल आॅफ नर्सिंगच्या मागणीप्रमाणे २५ हजार नर्सेसची आवश्यकता असताना निव्वळ १३ हजार नर्सेस आज कामावर आहेत. त्यांच्याकरिता आवश्यक असलेल्या सुविधा नाहीत, त्याचप्रमाणे रात्रंदिवस सेवा करणाऱ्या नर्सेसना संरक्षणसुद्धा नाही. त्यामुळे आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे.
मुंबईमधील सेंट जॉर्ज रुग्णालयात सीटीस्कॅन, एमआरआय मशीन उपलब्ध नाही, पॅथॉलॉजीचे आधुनिक युनिट नाही. त्याचप्रमाणे नायर रुग्णालयातील व्हेंटीलेटर मशीन्स नादुरुस्त आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी एक दीड महिना रुग्णांना ताटकळत राहावे लागते. यासाठी मोठी हॉस्पिटल्स सुसज्ज असणे आवश्यक आहे.
सर्व हॉस्पिटल्सना आवश्यक ती मशिनरी व कर्मचारी तातडीने उपलब्ध करुन द्यावेत, राजीव गांधी जीवनदायी योजनेत डिसेंबर २०१५ पर्यंत साडेचार लाख रुग्णांनी लाभ घेतला होता. निव्वळ नाव बदलून राजीव गांधी ऐवजी ज्योतिबा फुले जीवनदायी योजना लिहून उपयोग नाही. योजनेत होणारा भ्रष्टाचार व सुधारणा करणे आवश्यक आहे, असे खलिफे यांनी सांगितले.
मुंबई - गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण फार वाढलेले असून, महामार्गावर २-३ ट्रामा केअर युनिट सेंटरची फार आवश्यकता आहे. वारंवार मागणी करुनही शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप डॉक्टरांची पदे भरलेली नाहीत. मागील अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांनी आश्वासित केले होते. तथापि अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. तसेच आरोग्यविषयक सर्व मशिनरी जिल्हा रुग्णालयाला तातडीने पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
राजापूर येथे नगर परिषदेच्या मालकीच्या हॉस्पिटलचे हस्तांतर आरोग्य खात्याकडे करण्यात आले होते. सध्या ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत तयार असून, त्यामध्ये रुग्णालय सुरु आहे. मागील दहा वर्षे सातत्याने जुन्या दवाखान्याची जागेची मागणी नगर परिषद करीत आहे. तातडीने जुन्या रुग्णालयाची जागा नगर परिषदेला हस्तांतरीत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोकणासाठी शेततळी नसल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. तरी शेततळ्याचे अनुदान कोकणातील शेततळ्यांसाठी वाढवून देण्यात यावे. त्याचप्रमाणे दोन डोंगरांच्या मध्ये लहान बंधारे बांधण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरुन पावसाचे पाणी अडवून फळ बागायतदारांना व शेतकऱ्यांना या बंधाऱ्यातील पाणी वापरता येईल, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The Khalifeni Stalker Commentary on the Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.