‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती

By संदीप बांद्रे | Published: October 8, 2022 05:47 PM2022-10-08T17:47:57+5:302022-10-08T17:48:21+5:30

सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे.

Khandoba idol on horseback three hundred years ago in Lokmanya Tilak Memorial Reading museum | ‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती

‘लोटिस्मा’ संग्रहालयात तीनशे वर्षपूर्व अश्वारूढ खंडोबा मूर्ती

googlenewsNext

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयासाठी तीन किलो वजन आणि २६ सेंटीमीटर उंची असलेली अश्वारूढ खंडोबाची मूर्ती देण्यात आली आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे. पत्की यांच्या घराण्यात वारस नसल्यामुळे नित्यपूजेतील ही मूर्ती मोहन चितळे यांच्याकडे दिली होती. चितळे यांनी या मूर्तीसह आणखी दोन पूजेतील मुद्रांकित मूर्ती (टाक) लोटिस्माच्या संग्रहालयाला भेट दिले.

ब्रिटीशकाळात चिपळूण नगरपालिकेच्या शासन नियुक्त नगराध्यक्ष यांना ‘कार्यकारी अधिकारी’ म्हणत असत. पहिले अधिकारी म्हणून कै. रंगनाथ बापूजी पत्की यांची शासनाने निवड केली होती. १८७७ ते १९०७ असे सलग तीस वर्ष कै. पत्की या पदावर कार्यरत होते. शहरात आज उभे असलेले मच्छीमार्केट व मटणमार्केटची जागा पत्की यांची होती. नवा भैरी मंदिराची जागाही पत्की यांनीच दिली होती. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असलेल्या माधवबाग या ठिकाणी त्यांचा वाद होता. कालांतराने त्यांच्या वंशजांनी ही जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिली.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराची आजची इमारत असलेली जागा कै. पत्की नगराध्यक्ष असताना वाचनालयाला कराराने देण्यात आली होती. दीडशे वर्षांपूर्वीचे हे करारपत्र वाचनालयात उपलब्ध आहे. मोहन चितळे यांनी ही अमूल्य मूर्ती भेट देऊन शहराचे माजी नगराध्यक्ष कै. पत्की यांची सदैव आठवण राहील यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Khandoba idol on horseback three hundred years ago in Lokmanya Tilak Memorial Reading museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.