खेडमध्ये बंद दुकाने फोडून ६० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 03:23 PM2021-05-07T15:23:01+5:302021-05-07T15:23:40+5:30
Crimenews Khed Police Ratnagiri : खेड शहरातील बसस्थानकाच्या परिसरात सुपर मार्केट गल्लीतील बंद दुकाने व पोलीस स्थानकनजीकचे एक दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवार दि. ५ रोजी रात्री ११ ते गुरूवार दि. ६ रोजी सकाळी ७ या कालावधीत घडली आहे.
खेड : शहरातील बसस्थानकाच्या परिसरात सुपर मार्केट गल्लीतील बंद दुकाने व पोलीस स्थानकनजीकचे एक दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना बुधवार दि. ५ रोजी रात्री ११ ते गुरूवार दि. ६ रोजी सकाळी ७ या कालावधीत घडली आहे.
शहरातील बसस्थानका मागे सुपर मार्केट गल्लीत असलेले न्यू समर्थ फोटोज, मोहिमतुले झेरॉक्स आणि लॅमिनेशन या दुकानांसह खेड पोलीस स्थानक व तहसीलदार कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धनश्री झेरॉक्स या तीन दुकानांत चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
चोरट्याने लोखंडी कुलपे कोणत्यातरी धारदार हत्याने तोडून शटर उघडून दुकानांमध्ये प्रवेश केला. दुकानातील टेबलाच्या ड्रॉव्हरमधील ठेवलेली रोकड चोरट्याने पळवून नेली. मोहिमतुले झेरॉक्स दुकानातून ४५ हजार तर समर्थ फोटोज दुकानातून १५ हजाराची रोकड चोरीला गेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर चोरटे परिसरातील माहितगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरट्यांना लवकरच गजाआड करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.