खेड खाडीपट्टा अजून अविकसितच
By Admin | Published: September 1, 2014 09:15 PM2014-09-01T21:15:13+5:302014-09-02T00:02:05+5:30
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : करोडो रुपये खर्चूनही पन्हाळजे मार्गाची चाळण
खाडीपट्टा : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग येथील लोकप्रतिनिधींच्या उदासीन कारभारामुळे मागासलेलाच राहिला आहे. करोडो रुपये खर्चूनही पन्हाळजे मार्गाची महसूल खात्याच्या आशीर्वादाने वाळूमाफियांच्या अवजड वाहनांनी चाळण केली आहे.
निसर्गसौंदर्याने नटलेला खाडीपट्टा विभाग पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे होते. मात्र, शासनाच्या तसेच येथील लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे खाडीपट्टा विभाग आजही अविकसित राहिला आहे. जगबुडी नदीच्या काठावर वसलेल्या खाडीपट्ट्याला निसर्गत: सौंदर्य लाभले आहे.
सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिरवागार परिसर आणि नागमोडी वळणे हे दृश्य पावसाळ्यात विलोभनीय वाटते. तसेच वाहणारी जगबुडी नदी, नारळी, पोफळी व आंब्यांच्या बागा यामुळे निसर्गमय ठिकाण म्हणूनही या परिसराची ओळख आहे. किनाऱ्यावरील वस्त्या आणि परिसर विकासाअभावी दुर्लक्षित राहिला आहे. या परिसराचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल. जगबुडी नदी, दाभोळ खाडी व वाशिष्ठी नद्यांच्या संगमावर बहिरवली येथे मुघलकालीन दिवाबेट आहे. हा ठेवा म्हणजे निसर्गप्रेमी आणि जलपर्यटन प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. दुर्लक्षित असलेला हा खाडीतील भूभाग आणि येथे असलेले ऐतिहासिक अवशेष पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे आहेत. मात्र या भागातील सुविधांकडे शासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे पर्यटकांचे या भागाकडे लक्ष गेलेले दिसत नाही.
उन्हाळ्यातही पाण्याची विपुलता असल्याने खाडीकिनारे हिरवेगार असतात. डोळ्यांना सुखावणारी हिरवळ व गारवा यामुळे या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. सुमारे ४५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या भागात २३ गावांचा समावेश आहे. हा विभाग गुुहागर विधानसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघाचे नेतृत्व कामगारमंत्री भास्कर जाधव करीत आहेत. त्यांनी हा विभाग पर्यटनस्थळ बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता त्यांची घोषणा हवेतच विरली आहे.
गेल्या पाच वर्षांत सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडूनही खेड-पन्हाळजे मार्गाची दुरवस्था झाली आहे. पर्यटकांना दिवा बेटपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. दिवा बेटापुढे काही अंतरावर उन्हवरे येथे असलेल्या गरम पाण्याचे कुंड व कर्जी येथील कऱ्याचा डोंगर येथील धबधबा व पाण्याचा झरा अशा या दोन किलोमीटरच्या पट्ट्याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. येथील नदीकिनारच्या वस्त्यांकडे जाण्यासाठी रस्ते, पाणी, दळणवळणाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे पर्यटक फिरकतानाही दिसत नाहीत. (वार्ताहर)
पर्यटनाच्या विकासाऐवजी या ठिकाणी महसूल विभागाच्या आशीर्वादाने चोरट्या पध्दतीने वाळू उत्खनन होते. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येतो. येथील बेरोजगार युवक व युवतींना पर्यटनातून रोजगार मिळावा, या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.