खेड नगर परिषदेने केला पावणे दोन लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:52+5:302021-05-29T04:23:52+5:30
खेड : लॉकडाऊनच्या काळात कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने खुली ठेवणे, मास्क न वापरणे, गर्दी ...
खेड : लॉकडाऊनच्या काळात कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने खुली ठेवणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या दीड महिन्यात येथील नगर परिषदेच्या पथकाने तब्बल १ लाख ८० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ३० जण या कारवाईच्या कचाट्यात अडकले आहेत.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. लाॅकडाऊनच्या काळात सकाळी ७ ते ११ यावेळेतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने खुली ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, तरीही काही व्यावसायिक वेळेव्यतिरिक्तही दुकाने उघडी ठेवत असल्याने या दुकान व्यावसायिकांवर नगर परिषदेच्या पथकाने दंडात्मक कारवाई करत नोटीस बजावल्या. किराणा दुकानातून घरपाेच सेवा देण्याचे आदेश दिले असतानाही घरपाेच सेवा न देता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या व्यावसायिकांना नोटीस बजावत प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, तरीही मास्क न वापरता बाजारपेठेत वावरणाऱ्या नागरिकांवरही नगर परिषदेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. येथील नगर परिषदेच्या पथकाने बाजारपेठेवर करडी नजर ठेवली आहे. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी रजनीकांत जाधव, दिलीप पवार, संतोष जाधव, सुरेश चव्हाण, आदींचा या पथकात समावेश आहे.