Ratnagiri News: खेड पोलिसांनी जप्त केला एक लाखांचा देशी, विदेशी मद्यसाठा; दोघे ताब्यात
By अरुण आडिवरेकर | Published: March 14, 2023 02:39 PM2023-03-14T14:39:03+5:302023-03-14T14:39:26+5:30
रत्नागिरी : खेड तालुक्यातील आंबडस येथे टाकलेल्या दाेन छाप्यांमध्ये देशी - विदेशी दारूचा १ लाख २४ हजार ७३० रुपयांचा ...
रत्नागिरी : खेड तालुक्यातील आंबडस येथे टाकलेल्या दाेन छाप्यांमध्ये देशी - विदेशी दारूचा १ लाख २४ हजार ७३० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खेड पाेलिसांनी रविवारी (दि. १२) केली असून, दाेघांना ताब्यात घेतले आहे. अमित सदानंद करंजकर (वय-३९, रा. आंबडस, ता. खेड) आणि संतोष ज्ञानेश्वर मोरे (४८, रा. आंबडस, ता. खेड) अशी दाेघांची नावे आहेत.
खेडचे प्रभारी सहायक पाेलिस निरीक्षक सुजित गडदे यांना मिळालेल्या गाेपनीय माहितीच्या आधारे पथकाने केळणे गवळवाडी-आंबडस येथे पहिली कारवाई केली. या छाप्यामध्ये, केळणे गवळवाडी-आंबडस येथील एका दुकानाच्या पाठीमागील बाजूला असणाऱ्या खोलीत एकूण १,२५० विविध देशी-विदेशी मद्याच्या बाटल्याचा साठा करून ठेवण्यात आलेला हाेता.
अमित सदानंद करंजकर याच्याकडे गैरकायदा व बिगर परवाना तसेच शासनाचे कोणतेही शुल्क न भरता हा साठा केल्याचे स्पष्ट झाले. तसेच ताे नागरिकांना वाढीव भावाने विक्री करताना सापडल्याने त्याला महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर तसेच खेड पोलिस स्थानकात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), १८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई आंबडसमधीलच खोतवाडी येथे करण्यात आली. याठिकाणी टाकलेल्या छाप्यात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर मोरे याला २,२३० रूपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर खेड पोलिस स्थानकात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस काॅन्स्टेबल अजय कडू, रुपेश जोगी, राहुल कोरे व चालक पाेलिस हवालदार दिनेश कोटकर यांनी केली.