खेड तालुक्यात ११ गावे जोखीमग्रस्त जाहीर
By Admin | Published: June 19, 2016 12:53 AM2016-06-19T00:53:53+5:302016-06-19T00:55:19+5:30
पावसाळ्यासाठी सज्जता : बोरजवर आरोग्य विभागाची करडी नजर
खेड : तालुक्यातील आरोग्य विभागाने पावसाळ्यात करावयाच्या पूर्वतयारीच्या प्रात्याक्षिकाला सुरूवात केली आहे. तालुक्यातील गावनिहाय भेटी देत आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवकांमार्फत साथीचे आजार आणि उदभवणारे आजार याविषयी माहिती घेत मार्गदर्शन करत आहेत. प्रतिवर्षी जोखीमग्रस्त असणारी ११ गावे आणि बोरज गावातील साथीच्या आजारांवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे.
दूषित पाण्याबाबत आरोग्य विभाग गंभीर असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका अधिकारी शिंदे यांनी दिली. तसेच आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत भरणे, भरणे नाका, सुकिवली, कळंबणी बुद्रुक, अस्तान, उधळे बुद्रुक आणि नांदीवली या गावांमध्ये यापूर्वी साथीचे आजार उद्भवले असून, त्यानुसार या गावांमध्ये आरोग्य विभागाच्यावतीने संबंधित डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली एक पथक कार्यरत करण्यात आले आहे.
तालुक्यातील वावे, लोटे, शिव बुद्रुक, तिसंगी आणि कोरेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत एकाही गावामध्ये साथीचे आजार उद्भवत नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या भरणे नाका, भरणे, सुकिवली, उधळे बुद्रुक, कळंबणी बुद्रुक व चाटव या गावांमध्ये आरोग्य विभाग दक्ष आहे. या गावांमध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्याही स्वरूपात येण्याची शक्यता असल्याने या गावांमध्ये आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. वावे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील सापिर्ली व चोरवणे, लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील कोतवली टेप, भोईवाडी व शेल्डी, शिव बु्रद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील अलसुरे मोहल्ला आणि आयनी या गावांमध्ये दक्षता बाळगण्यात येत आहे. तालुक्यातील ही ११ गावे जोखीमग्रस्त म्हणून आरोग्य विभागाने घोषीत केली आहेत़ तालुक्यातील अतिदुर्गम गावांमध्ये होडखाड, पन्हाळजे, अनसपुरे, तळघर, पोयनार, घेरापालगड, नांदीवली, विहाळी, मालदे, अस्तान धनगरवाडी, वडगाव खुर्द, वडगाव बु, धवडे, आपेडे, कळंबणी बु, शिरवली दंडवाडी, निळवणे कातळवाडी, आंबवली धनगरवाडी, वरवली धनगरवाडी, हुंबरी धनगरवाडी, खालची हुंबरी धनगरवाडी, किंजळे, कांदोशी, कळंबणी खुर्द, कासई, केळणे, मेटे, असगणी, कुंभाड, शिरगाव आणि माणी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
या गावांमध्ये तत्काळ सुविधा पोहोचू शकत नसल्याने या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. बोरज गावावर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून असून, हा गाव शिव बुद्रुक या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असून, या गावांमध्ये २०१५मध्ये अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाली होती. गावातील ७४ लोकांना अतिसाराची लागण झाली होती तर गावातील एकाचा मृत्यू झाला होता. पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी न घेतल्याने आणि अंतर्गत असमन्वयामुळे ही अतिसाराची लागण झाल्याचे त्यावेळी समोर आले होते.
त्यावेळी तालुका आरोग्य विभागाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे ही साथ नंतर आटोक्यात आली होती. ही साथ पुन्हा उद्भवू नये, याकरिता आरोग्य विभाग बोरज गावातील पिण्याच्या पाण्यावर तसेच इतर आजारांवर विशेष लक्ष ठेवून आहे.
बोरजप्रमाणे अन्य गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात साथीचे आजार पसरत असल्याने या गावांवर देखील आरोग्य विभागचे कर्मचारी अहोरात्र लक्ष ठेवून आहेत. (प्रतिनिधी)