‘खेम’चे होणार स्ट्रक्चरल आॅडिट
By admin | Published: July 8, 2017 06:15 PM2017-07-08T18:15:08+5:302017-07-08T18:15:08+5:30
पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती : धरण बनले धोकादायक
आॅनलाईन लोकमत
दापोली (जि. रत्नागिरी), दि. ८ :दापोली तालुक्यातील हर्णै - अडखळ - खेम धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे धरण धोकादायक बनले आहे. जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून या धरणाची पाहणी करण्यात आली. या खेम धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे, असा अहवाल सादर होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासूनच खेम धरणाला गळती लागली आहे. मात्र, दरवर्षी या धरणाच्या भिंतीतून पाण्याच्या गळतीची तीव्रता वाढत आहे. धरणाची भिंत दगडी असल्याने दगडी धरणाच्या तज्ज्ञ यंत्रणेकडून धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी, अधीक्षक दगडी धरण मंडळ, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, दिंडोशी रोड, नाशिक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
खेम धरणाला लागलेल्या गळतीमुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या धरणाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन या धरणाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.