खेरशेत प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांना कोंडले

By Admin | Published: September 1, 2016 12:03 AM2016-09-01T00:03:52+5:302016-09-01T00:42:03+5:30

चिपळूण पाटबंधारे कार्यालयावर धडक : टेबल, खुर्च्या, खिडक्यांची नासधूस; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांची सुटका

Khershet project affected officials | खेरशेत प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांना कोंडले

खेरशेत प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांना कोंडले

googlenewsNext

चिपळूण : प्रकल्पग्रस्तांना बैठकीला बोलावून स्वत: बाहेर निघून जाणाऱ्या लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे संतप्त झालेल्या खेरशेतमधील गडनदी प्रकल्पग्रस्तांनी चिपळूण लघुपाटबंधारे कार्यालयातील खुर्च्या, टेबल व खिडक्यांची नासधूस करीत अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.
गडनदी प्रकल्पग्रस्तांचे खेरशेत येथे पुनर्वसन झाले आहे. मात्र पुनर्वसन होऊनही आपला पाणीप्रश्न न सुटल्याने हे प्रकल्पग्रस्त संतप्त झाले होते. पाण्याचा पंप वारंवार बंद पडणे, पाईप फुटणे असे प्रकार घडत आहेत. याबाबतची कल्पना देऊनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. पाणी योजनेवर काम करणाऱ्या कामगारांचे वेतनही अधिकाऱ्यांनी दिलेले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रकल्पग्रस्तांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजता लघुपाटबंधारे कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक घेण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे बुधवारी प्रकल्पग्रस्त बैठकीसाठी हजर झाले. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने हा प्रश्न मांडण्यासाठी अनिल घोसाळकर, पंकज सावंत, शांताराम बल्लाळ, दत्ताजी गायकवाड, उत्तम गायकवाड, विलास गायकवाड, सीताराम निकम, वसंत भुरावले, विजय गायकवाड, सुभाष बल्लाळ, सचिन जाधव यांच्यासह अनेक महिलाही येथे उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या मेघना शिंदे, मंगेश शिंदे, युवक तालुकाध्यक्ष अजय साळवी, शहराध्यक्ष प्रफुल्ल पिसे, भाजपचे महेंद्र कदम, शेखर साबळे, प्रणय वाडकर, आदी पदाधिकारी होते.
प्रकल्पग्रस्त कार्यालयात आले असता अधिकारी तेथून निघून गेले. या घटनेमुळे प्रकल्पग्रस्त अधिकच आक्रमक झाले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता व्ही. बी. लोंडे यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला आणि कार्यालयाला बाहेरून कडी लावून सर्वांना कोंडून ठेवले. कार्यालयातील खुर्च्या अस्ताव्यस्त फेकल्या. खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. वातावरण अधिक तंग झाले.
काही अधिकाऱ्यांनी हा प्रकार चिपळूण पोलिस स्थानकाला कळवला. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक दाभोळकर, संकेत शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रकल्पग्रस्तांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
कार्यालय उघडण्यात आल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी उपकार्यकारी अभियंता व्ही. बी. लोंडे यांना घेराव घातला. कार्यकारी अभियंता भालेराव यांच्याशी चर्चा करून जोपर्यंत पाणी प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी तत्काळ पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि प्रकल्पग्रस्त परत गेले. (प्रतिनिधी)

Web Title: Khershet project affected officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.