कशेडी घाट अजूनही ‘डेंजर झोन’मध्येच
By admin | Published: October 28, 2014 10:51 PM2014-10-28T22:51:15+5:302014-10-29T00:12:03+5:30
छोट्या-मोठ्या दरडी कोसळत असल्याने हा मार्गच धोकादायक
खेड : महामार्गावरील कशेडी घाटात वारंवार कोसळणाऱ्या दरडी, खचणारा रस्ता यामुळे कशेडी घाटाचा ‘डेंजर झोन’मध्ये सामावेश करण्यात आला आहे.गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवात या मार्गावरील वाढणारी वाहतूक लक्षात घेता गतवर्षी या घाटात अजस्त्र दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विविध कारणांनी या मार्गावरील वाहतूक वारंवार खंडित होते. छोट्या-मोठ्या दरडी कोसळत असल्याने हा मार्गच धोकादायक बनला असून तो वारंवार बंद पडतो.
कशेडी घाटासाठी महाड-शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे. काहीवेळा याच मार्गाचा वापर करावा लागतो. कशेडी घाट राज्यमार्ग असल्याने येथे वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाढणाऱ्या पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी सध्याच्या मार्गाच्या चौपदरीकरणासह तुळशी विन्हेरे मार्गाचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे़
प्रवाशांच्या दृष्टीने कशेडी मार्गावरील वाहतूक असुरक्षित आहे. यामुळे महामार्ग विभागाने आपली नजर या घाटरस्त्याच्या सुरक्षिततेवर ठेवली आहे. कशेडी ते खवटी हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातील धोकादायक घाट आहे. या घाटमाथ्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात़ मात्र, सतत वाढलेली वाहनांची संख्या, अवजड वाहतूक व निसर्गाचा कहर यामुळे हा घाट अतिधोकादायक बनला आहे़ रायगड जिल्ह्यातील भोगावच्या हद्दीत कित्येक वर्षांपासून कोसळणाऱ्या दरडींमुळे १५० मीटर अंतराचा रस्ताही खचला आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणात या रस्त्याचे काम होणार आहे. मात्र, दरडी कोसळण्याची भीती कायम राहणार आहे. जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत धामणदेवी व भोगावच्या हद्दीत कोसळलेल्या दरडींमुळे हा मार्ग तब्बल बारा दिवस बंद होता. २०११मध्ये ऐन गणेशोत्सवात ३ आणि ४ आॅगस्टला खेड तालुक्यातील काळकाई मंदिरापासून जवळच तीन वेळा मोठ्या दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता.
महाड मार्ग बांधकाम विभागाकडून भोगाव गावच्या हद्दीत खचणारा रस्ता दरवर्षी दुरूस्त करण्यात येतो. परंतु हा रस्ता पुन्हा पुन्हा खचतो. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन आहे. मात्र तीन वर्षे ती बंद आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतकार्यात अडचणी निर्माण होतात. कशेडी घाटासाठी महाड-शिरगाव येथून तुळशी खिंडमार्गे नातूनगर हा पर्यायी मार्ग आहे़
हा राज्यमार्ग असल्याने कशेडी घाटातील वाहतूक ठप्प झाल्यानंतर पर्यायी वाहतुकीचा बोजा सहन करण्यासाठी मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)